नाशिक | प्रतिनिधी | Nashik
‘शालार्थ’ आयडी घोटाळ्याप्रकरणी (Shalarth ID scam Case) अटकेत असलेला माजी शिक्षण उपसंचालक संशयित (Suspected) नितीन उपासनी याने केवळ एक आयडी मंजूर करण्यासाठी ‘वैयक्तिक’ स्तरावर तीन ते पाच लाख रुपयांचा ‘रेट’ ठरविला हाेता, असे आर्थिक गुन्हेशाखेच्या तपासात समाेर येते आहे.
उत्तर महाराष्ट्रातील (Uttar Maharashtra) या घोटाळ्याचा ‘मास्टरमाइंड’ ताेच असल्याचे उघड हाेत असून त्याने सेवेत असताना व निवृत्तीनंतरही सुमारे एक हजार शालार्थ आयडींच्या फाईल्सवर सह्या करीत आऊटडेटेड अर्थात जुन्या दिनांकाच्या नियुक्ती पत्रांद्वारे ‘आयडी’ मंजूर केल्याचे उघड हाेत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयातील कोपऱ्यात बसलेल्या उपासनीला पोलिसांनी (Police) शुक्रवारी हिसका देऊन ‘कायद्याचा बालेकिल्ला’ हा ‘पॅटर्न’ दाखविल्याचे समजते.
‘नाशिकचे तत्कालीन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन २७ मार्च २०२५ रोजी नाशिकरोड पोलिसांत ‘शालार्थ’ घोटाळ्याचा गुन्हा नोंद आहे. जळगाव जिल्ह्यातील दहा शिक्षण संस्थांसह शालेय पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिकांसोबत संगनमत करुन बनावट ‘शालार्थ आयडी’ बनविल्याचा हा गुन्हा आहे. मात्र, या गुन्ह्यात दस्तुरखुद्द फिर्यादी चव्हाण हाच या गुन्ह्यातील मुख्य संशयित असल्याचे पोलिसांनी (Police) न्यायालयात सादर केलेल्या उत्तरांत स्पष्ट नमूद केले आहे. त्यामुळे चव्हाणवर अटकेची टांगती तलवार असून, त्याला अटक झाल्यावर अनेक ‘गौप्यस्फोट’ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, याप्रकरणात अंमळनेर (Amalner) येथून संशयित मनोज रामचंद्र पाटील (रा. नवलनगर, धुळे), निलेश निंबा पाटील (रा. चिंचोली, ता. चोपडा) या दोघांसह अविनाश पाटील, दत्तात्रय पाटील (वय ६५) यांनाही अटक केली होती. त्यापैकी मनोज व दत्तात्रय हे शिक्षण संस्थाचालक असून, निलेश हा जिल्हा परिषदेतील कर्मचारी आहे. याच गुन्ह्यात नाशिकरोड पोलीस ठाण्याचे (Nashik Road Police Station) तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यालाही सहसंशयित केले असून ताे सध्या निलंबित आहे.
काय आहे शालार्थ आयडी?
वैयक्तिक मान्यताप्राप्त शिक्षक, शिक्षकेतरांना शालार्थ आयडी क्रमांक दिला जातो. हा क्रमांक शिक्षक, शिक्षकेतरांना वेतन सुरू होण्यासाठी गरजेचा आहे. मान्यतेसाठी मुख्याध्यापक माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालकांकडे तर शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालकांकडे शिफारस करतात.
मुद्दे
- भुसावळच्या एका शाळेत दोन सख्ख्या भावांना एकाच जावक क्रमांकावरुन नियुक्त्या
- आवक-जावक रजिस्टरमध्ये शिल्लक दोन ओळ्यांमध्ये दुसऱ्या पेनाने फेरफार
- उपासनी हा कार्यालयात नसताना संशयित भाऊसाहेब चव्हाण हजर झाला होता
- उपासनी कार्यालयात येण्यापूर्वीच चव्हाणने आवक-जावक रजिस्टर ताब्यात घेऊन ‘क्लोज’ केले
- भाऊसाहेबचा शाेध सुरुच





