नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मित्राने (Friend) लग्नाच्या वाढदिवसाचे (Birthday) फोटो व्हाट्स अॅप स्टेटसला अपलोड केल्याने संतापलेल्या मैत्रिणीने भावासह त्याच्या मित्रांकरवी मित्राचा घरात मारहाण (Beating) करुन घात केला. मित्राचा मृतदेह विल्होळी शिवारात फेकल्याचे उघड झाले आहे. सूरज काशिनाथ घोरपडे (वय ३९, रा. कामगारनगर, सातपूर) असे मृताचे नाव आहे.
शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकने (Crime Branch Unit One) तपास करुन मुख्य संशयित व मैत्रिणीचा सख्खा भाऊ शशिकांत उर्फ नाना रामदास गांगुर्डे (वय २७, रा. संघर्षनगर, विल्होळी) याला अटक केली आहे. तर, संशयित मैत्रीण इंदू विजय साळवे हिला तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विल्होळी शिवारातील जैन मंदिराजवळील मोकळ्या मैदानात मंगळवारी (दि. १३) सकाळच्या सुमारास बेवारस मृतदेह (Dead Body) आढळला होता.
शहर पोलिसांसह तालुका पोलिसांनी (Taluka Police) तपास सुरु केला असता गुन्हेशाखा युनिट एकने हा मृतदेह सूरज घोरपडेयांचा असल्याचे निष्पन्न केले. त्यानुसार तपासास प्रारंभ केला असता अनेक बाबींचा उलगडा झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित महिला इंदू साळवे ही गेल्या चार वर्षांपासून बेरोजगारी व मोलमजुरी करणाऱ्या सूरजच्या संपर्कात होती. ते एकमेकांचे मित्र-मैत्रिण होते. दरम्यान, १० मेस सूरजची ‘मॅरेज अॅनिव्हर्सरी’ होती. त्यामुळे त्याने लग्नाचे फोटो स्टेटसला अपलोड केले. हे स्टेटस मैत्रीण इंदूने बघितल्याने तिचा पारा चढला. तिने सूरजला फोन करुन वाद घातला.
यानंतर, ११ ते १२ मेस सूरज हा इंदूची समजूत काढण्यासाठी तिच्या विल्होळी शिवारातील (Vilholi Shivar) घरी पोहोचला. तेव्हा येथे उपस्थित असलेल्या संशयित इंदू साळवे, तिचा भाऊ शशिकांत गांगुर्डे व त्याचे मित्र नवीन सोनकांबळे उर्फ साळवे (रा. संघर्षनगर, विल्होळी) व अजय रामदास कांबळे (रा. तळेगाव काचुर्ली, ता. त्र्यंबकेश्वर) यांनी सूरजशी वाद घालून इंदूची बाजू घेत त्याला घरातच जबर मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे दिसताच त्यांनी खूनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी संगनमताने विल्होळीतील निर्जनस्थळी मृतदेह फेकून देत विल्हेवाट लावली. याचदरम्यान काही संशयितांनी मद्यपान केल्याचे घटनास्थळी आढळलेल्या मद्याच्या बाटल्यांवरुन दिसून आले. याबाबत मृत सूरजच्या भावाने नाशिक तालुका पोलिसांत फिर्याद नोंदवली आहे.
असा लागला छडा
गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या सूचनेने या संशयास्पद मृतदेहाचा तपास करण्यात आला. तेव्हा अंमलदार नितीन जगताप यांना गांगुर्डेची माहिती मिळाली. पथकाने या आधारे त्र्यंबकेश्वर येथे सापळा रचून मुख्य संशयित शशिकांत गांगुर्डे यास पकडले. ही कारवाई सहायक निरीक्षक हिरामण भोये, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार महेश साळुंके, मुक्तार शेख आर्दीच्या पथकाने केली. आता पथके नवीन सोनकांबळे व अजय कांबळे यांचा शोध घेत आहेत.