नाशिक | Nashik
गळफास घेतलेल्या अवस्थेतील पतीच्या लटकत्या मृतदेहासमोर मांडलेल्या पूजासाहित्याजवळ त्याची पत्नी पूजाविधी करण्यासाठी बसली असल्याचा व्हिडिओ आज (दि.२१) सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा प्रकार अघोरी आणि जादूटोण्याचा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला शिवाय तो व्हिडिओ व्हायरल झाल्याने जेलरोड भागात (Jail Road Area) जादूटोण्याच्या आणि अंधश्रद्धेच्या प्रकारातून पतीचा बळी दिला गेल्याची चर्चा सुरू होती. मात्र या चर्चेचे नाशिकरोड पोलिसांनी (Nashik Road Police) खंडन केले असून हा प्रकार अघोरी किंवा जादूटोण्यातून झालेला नसून मानसिक व कौटुंबिक जाचातून घडला असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. नागरिक मात्र या व्हिडिओच्या आधारे शंका उपस्थित करत आहेत.
हे देखील वाचा : Nashik Crime News : लाकडाच्या भुकटीआड मद्यतस्करी; पाठलाग करुन वाहन पकडले
जेलरोड भागातील ब्रिजनगरमध्ये ११ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठपूर्वी नवनाथ भगवंत घायवट (५४) या व्यक्तीने त्याच्या घरी स्वयंपाक घरातील छताला असलेल्या हुकाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. परंतु या घटनेला आठवड्याचा कालावधी उलटल्यानंतर नवनाथ घायवट या व्यक्तीचा गळफास (Hanging) घेतलेल्या अवस्थेतील व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले.
हे देखील वाचा : Nashik Crime News : सावकारीचा पाश सुटेना; दोघांचा शोध सुरू
या व्हिडिओत छताला लटकलेल्या अवस्थेतील नवनाथ घायवट यांच्या मृतदेहाच्या (Dead Body) खाली आणि आजूबाजूला धार्मिक पूजा मांडलेली दिसून येते. जवळच एक महिला बसलेली दिसते. याशिवाय मृतदेहाच्या अंगावरही ठिकठिकाणी हळद व कुंकवासारखे पूजेचे साहित्य लावलेले दिसून येत असल्याने हा प्रकार अघोरी आणि जादूटोण्याचा असल्याची शंका नागरिकांनी व्यक्त केली. मात्र अधिक तपासात दुसरी बाजू उजेडात येते आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : अटकेची भीती दाखवून फसवणूक
जादूटोण्याचा पोलिसांकडून इन्कार
नवनाथ घायवट या व्यक्तीचा मृत्यू हा गळफास घेतल्याने झाला असून जादूटोणा, अघोरी प्रकराचा या घटनेशी काहीही संबंध नसल्याचा दावा नाशिकरोड पोलिसांनी केला आहे. मयत नवनाथ याची पत्नी ही मानसिक रुग्ण असून तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. घटनेच्या दिवशी त्यांच्या घरी दुर्गाष्टमीची पूजा आयोजित केलेली होती. याचवेळी कदाचित त्यांच्यात काहीतरी कौटुंबिक कलह झाला असण्याची आणि त्यातून पत्नीच्या त्रासाला कंटाळून नवनाथने गळफास घेऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. घायवट यांचे किराणा दुकान असून मुले शिक्षणासाठी पुण्यात आहेत. पत्नी वेडसर वागत असल्याने वारंवार घर सोडून जाते. या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. तर घायवट यांच्या पत्नीवर सुरू असलेल्या मानसिक वैद्यकीय उपचारांची कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केली आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा