नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरात तोतया पोलीस (Police) बनून वयस्क महिला व ज्येष्ठ नागरिकांना गाठत त्यांच्या अंगावरील दागिने लंपास करण्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसून उपनगर व इंदिरानगर हद्दीत घडलेल्या घटनांनंतर आता चोपडा लॉन्स परिसरात ७५ वर्षीय महिलेची अशाच पद्धतीने फसवणूक (Fraud) झाल्याने खळबळ उडाली आहे. एकामागून एक घटना घडूनही चोरटे मोकाट असून त्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर ठाकले आहे.
विशेष म्हणजे, एकापाठोपाठ एक घटना घडूनही तोतया पोलीस अद्याप खऱ्या पोलिसांच्या हाती न लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जयश्री शंकरराव चांदगुडे (वय ७५, रा. सुयोग बंगलो, लोकमान्यनगर, गंगापूर रोड) या सोमवारी (दि. २) दुपारी सुमारे तीनच्या सुमारास घराबाहेर फेरफटका मारण्यासाठी निघाल्या. चोपडा लॉन्ससमोरील ट्रॅव्हल्स कार्यालयाजवळ दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडवून आपण पोलीस असल्याची बतावणी केली. वयोमानामुळे आणि आत्मविश्वासाने बोलण्यामुळे चांदगुडे यांचा त्यांच्यावर विश्वास बसला.
संशयितांनी परिसरात एका महिलेच्या (Woman) गळ्याला चाकू लावून लुटमार झाल्याची बनावट माहिती सांगत, “सुरक्षेच्या दृष्टीने अंगावरील दागिने घालून फिरू नका,” असा सल्ला दिला. या कथित धोक्यामुळे घाबरलेल्या चांदगुडे यांनी गळ्यातील सुमारे १ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व ४० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, असे एकूण १ लाख ८० हजार रुपयांचे दागिने काढून तोतया पोलिसांना दिले. दागिने सुरक्षित ठेवून देतो, असा बहाणा करत संशयितांनी ते एका कागदात गुंडाळले आणि हातचलाखीने ती पुडी बदलून दुसरी कागदी पुडी चांदगुडे यांच्या हाती दिली.
दरम्यान, घरी परतल्यानंतर पुडी उघडताच त्यात दागिन्यांऐवजी दगड आढळून आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार खोडे तपास करीत आहेत.





