नाशिक | Nashik
शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी ‘ऑपरेशन क्लिनअप सुरु असून, त्याचाच एक भाग म्हणूण गुन्हेशाखा युनिट एकमध्ये (Unit One) अनेक राजकीय व इतर सराईतांना (Criminal) आवतन धाडण्यात येत आहे. काही सराईत आणि ‘हिटस्ट्रीशिटर’ राजकारणी येताच त्यांचे ‘क्राईम ब्रान्च’कडून हसतमुखाने स्वागत केल्यावर काही वेळातच पुन्हा त्यांना कार्यालयाबाहेर पाठवून ‘चप्पल, बूट’ बाहेर काढून येण्याचे असे फर्मान सोडल्यावर अनवाणी आत येताच त्यांचा ‘कोंबडा’ बनवून दिवाळीपूर्वीच ‘फटाक्यांसह कडक चहाची मेजवाणी’ दिली जात आहे. आतापर्यंत १२ जणांनी या मेजवाणीसह महाप्रसादाचा लाभ घेतला आहे.
‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ हे अनेकांच्या तोंडी वदवून घेतल्यानंतर, त्याचा सकारात्मक परिणाम शहरात दिसू लागला आहे. शहरात गोळीबाराच्या (Firing Case) गुन्ह्यांत माजी नगरसेवक जगदीश पाटील, भाजप नेते सुनील बागुल यांच्या समर्थकांसह सराईत गुंड, रिपाइं माजी नगसेवक प्रकाश लोंढेसह त्यांच्या पुत्रांवर गुन्हे नोंद होऊन अटक झाली. तर, माजी नगरसेवक उद्धव निमसे कारागृहात आहेत.
दरम्यान शनिवारी (दि. ११) भाजप नेता व माजी नगरसेवक मुकेश शहाणे (Mukesh Shahane) यांना बोलविण्यात आले व त्यांच्यासह कार्यकर्त्यांना खासगी ‘बाउन्सर्स’ लाही पोलिसांनी ‘कडक चहा’ पाजल्याने खळबळ उडाली. शहाणे यांच्यावर मामा राजवाडेंप्रमाणे कारवाई होईल, अशी धास्ती अनेकांना होती. ‘बड्या’ लोकप्रतिनिधींसह काही ‘मान्यवरांनी’ मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतु, चहा पाजतांना पथकांनी ‘पोलिसी खाक्या’ पुरेपूर दाखवला.
‘महाप्रसादाचे मानकरी’
सुनील बागूल, मुकेश शहाणे, अंकुश पवार, मुकेश शेवाळे, प्रशांत जाधव, देवेंद्र पाटील यांना पोलिसांनी महाप्रसाद दिल्याचे समजते. तर पाहुणचारासाठीच्या ८८ ‘अतिथीं’ ची यादीही आयुक्तालयाने तयार केली आहे. त्यात दररोज एकऐकाला आवतण धाडले जाणार आहे.
‘साहेब, हॅप्पी बर्थ डे’
शहरातील ‘आरटीपीसीं’सह एका अंमलदाराचा शनिवारी वाढदिवस होता. ‘चर्चा’ सुरू असताना केक कापण्याचे ठरले. तेव्हाच शहरावर पकड असलेल्या भाजप नेत्यांच्या ‘भाऊ’ला तिथे ‘फटाके’ देण्यासाठी आणले होते. तीन अंमलदारांचे अधिकाऱ्यांसहित ‘बर्थडे सेलिब्रेशन’ सुरू असताना ‘भाऊ’ला हात जोडून एका कोपऱ्यात उभे केले. तेव्हा ‘बॉस, हॅप्पी बर्थडे’ असे तो ‘भाऊ’ अंमलदारांना म्हणाला.




