Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमNashik Crime : दिवाळीत 'दृश्य पोलिसिंग'; काही सराईत ताब्यात

Nashik Crime : दिवाळीत ‘दृश्य पोलिसिंग’; काही सराईत ताब्यात

विविध ठिकाणी नाकेबंदी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दिवाळीच्या (Diwali) पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी सर्वत्र बंदोबस्त तैनात करून गुन्हेगारी (Criminal) पार्श्वभूमीच्या संशयितांची धरपकड सुरू केली आहे. कायदा व सुव्यवस्थेसह नागरिकांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्ताची आखणी केली आहे. शहरात सध्या सायंकाळी साडेसहा वाजेपासून रात्री उशिरापर्यंत प्रमुख ठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. पथकांची पायी गस्त सुरू असताना रेडिअम जॅकेटस् परिधान करून अंमलदार तैनात आहेत. या ‘व्हिजिबल पोलिसिंग’ मुळे उत्सव काळातील गैरप्रकार रोखणे पोलिसांना शक्य होणार आहे.

- Advertisement -

दीपोत्सवानिमित्त बाजारपेठांमधील खरेदी-विक्रीसह आर्थिक उलाढाल सुरू असल्याने पोलिसांनीही खबरदारी घेतली आहे. त्यानुसार तेरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असलेल्या बाजारपेठा, प्रमुख चौक, गर्दीच्या ठिकाणांजवळ नाकाबंदी करण्यात येत आहे. सायंकाळी साडेसहा वाजेपासून रात्री अकरापर्यंत ही नाकाबंदी सुरू आहे. गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनीही बॅरिकेडिंग केली असून, गुन्हे शोध पथकांसह स्थानिक पोलीस ठाण्याच्या (Police Station) पथकांनाही तपासाचे आदेश आहेत. विशेष म्हणजे, उत्सवकाळात बाजारात पोलीस ‘प्रेझेन्स’ राहावा म्हणून नाकाबंदीच्या ठिकाणी ‘रेडिअम जॅकेटस् परिधान करण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे सायंकाळी ठिकठिकाणी पोलिसांची पथके उभी असल्याचा प्रत्यय शहरात येत आहे.

YouTube video player

यासह रेकॉर्डवरील सोनसाखळी चोरटे, बॅगा खेचणारे, लूटमार करणारे, बाजारात भुरट्या चोऱ्या करणाऱ्या संशयितांची चौकशी पोलीस करत आहेत. कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून संशयितांची धरपकड सुरू आहे. तर दिवाळीच्या सुटीत होणाऱ्या घरफोड्यांसह सोनसाखळी खेचण्याचे प्रकार रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शोध पथकांवर जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासाठी सराईत गुन्हेगारांची चौकशी करून काही जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे.

बाजारपेठेत सुवर्ण खरेदीसह मोठ्या आर्थिक उलाढालींना सुरुवात झाल्याने साध्या वेशातील पोलिसांची गस्त बाजारात सुरू आहे. गर्दीच्या ठिकाणी पायी गस्त सुरू असून, नागरिकांना सुरक्षिततेसंदर्भात सूचना देण्यात येत आहेत. यासह बाहेरून येणाऱ्या प्रवाशांकडेही दागिने असल्याने बस स्थानके, रेल्वे स्थानक परिसरातही पथके तैनात आहेत. तसेच अंबड -सातपूर या दोन्ही औद्योगिक वसाहतींमध्ये बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

पोलिसांचे नियोजन

  • शहरातील सीसीटीव्हींद्वारे हालचालींवर बारीक नजर
  • गुन्हे शोध पथकांसह पोलिस ठाण्याची गस्ती पथके
  • चैन स्नॅचर्सला रोखण्यासाठी नाकाबंदी
  • घरफोडी टाळण्यासाठी ‘बीटमार्शल्स’ तर्फे सूचना
  • सोसायटींसह चौकांत पोलिसांचे प्रबोधन
  • ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना

ताज्या बातम्या