नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
जळगावातून नाशिकला (Nashik) आणलेले एका व्यापाऱ्याचे कडधान्य परस्पर विक्री करण्याच्या दृष्टीने पळणाऱ्या एका वाहन चालकाला नाशिकरोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने (Nashik Road Police Crime Branch) शिताफीने अटक केली आहे.
याबाबत नाशिकरोड पोलिसांनी (Nashik Road Police) दिलेली माहिती अशी की नाशिकरोड येथील व्यापारी दौलत हरगोविंद देवानी यांनी जळगाव एमआयडीसी येथील उषा इंटरप्रायजेस, वसंत इंटरप्रायजेस, कोगटा इपोर्ट दाल मिल आदी कंपन्यातून डिलिव्हरी करीता हिरवा वाटाणा, मठ डाळ, मूग, हरभरा डाळ, अशा धान्याचे १०५ पोते असे २ लाख ३९ हजार ७३२ रुपये किमतीचे धान्य विश्वासू चालक अजीज खान याच्याकडे महिंद्रा पीकअप एम, एच, १५ जे, डब्ल्यू, ८३६५ हिने नाशिक येथे पाठवले होते.
मात्र संशयित (Suspected) खान याने वाहनातील कडधान्य परस्पर विक्री करीत पोबारा केला होता. देवानी यांनी याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात ८ डिसेंबर रोजी तक्रार दिली होती. त्यानुसार पोलीस तपास करीत असताना तसेच याबाबत आरोपी संदर्भात कुठलीही माहिती नसताना गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील यांना संशयित आरोपी संदर्भात गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना दिली.
त्यानंतर सपकाळे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे, गुन्हे शोध पथकाचे सहा, पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस कर्मचारी सागर आडने, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे, आदींनी देवळाली गावातील गांधी पुतळ्याजवळ सापळा रचला. संशयित खान हा पिक अप वाहन घेऊन आला त्यानंतर पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून २ लाख ४० हजाराची रोकड व ८ लाखाचे वाहन जप्त करण्यात आले. या कामगिरीबद्दल पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, हवालदार विशाल पाटील, अरुण गाडेकर यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.





