करंजी खुर्द | प्रतिनिधी | Karanji Khurd
निफाड तालुक्यातील (Nipahd Taluka) म्हाळसाकोरे शिवारात (दि. १३ जुलै रोजी ) मध्यरात्री साडेबारा ते पहाटे तीन दरम्यान सशस्त्र टोळीने थरारक घरफोडी (Robbery) करत चार ठिकाणी चोरी व मारहाण (Beating) करत पळ काढला होता. त्यानंतर आता या सराईत चोरट्यांना नाशिक ग्रामीण (Nashik Rural) व सायखेडा पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने विशेष सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत .
याबाबत अधिक माहिती अशी की, निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे (Mhalsakore) येथील सिन्नर रोड लगत असलेल्या विठ्ठल शिवाजी वाळके यांना त्यांच्या वस्तीवर गंभीर मारहाण केली होती. तर याच परिसरातील शिवाचा माळ येथील राजू दत्तू मुरकुटे यांच्या घराचा दरवाजा तोडून आत शिरत मुरकुटे व घरातील इतर महिलांना (Women) कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोने व कपाटातून रोख रक्कम असा एकूण ३ लाख ८४ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. त्यानंतर घटनेचे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरलेकर यांनी गांभीर्य लक्षात घेता गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास पथकांना विशेष सूचना दिल्या दिल्या होत्या.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर व सायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास ढोकरे यांच्या पथकाने विशाल रमेश बनसोडे (वय २३, रा.सायाळे बुद्रुक, ता. मालेगाव जि. नाशिक) दिलीप अशोक चव्हाण (वय ३०, रा.सोमठाणे ता.सिन्नर जि.नाशिक) राहुल नाना चव्हाण (वय २६ रा. सायखेडा ता.निफाड जि.नाशिक) यांना फिर्यादी, साक्षीदार यांनी व प्रत्यक्षदर्शींनी बघितलेल्या वर्णनावरून, तसेच घटनास्थळी मिळून आलेले भौतिक पुरावे, उपलब्ध पुराव्यांचे तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळवून ताब्यात घेतले आहे.
त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपींची विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली असता, त्यांनी त्यांचे रायगड व मालेगाव येथील साथीदारांसह घटनेच्या दिवशी रात्रीच्या वेळी मोटार सायकलवर येऊन वस्तीवरील घरांमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून कोयत्याचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देऊन महिलांच्या अंगावरील व कपाटातील सोन्याचे दागिने बळजबरीने चोरून नेले. तसेच इतरही चार ते पाच घरांमध्ये कोयत्याचा धाक दाखवून चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याची कबुली त्यांनी दिली.
दरम्यान, यानंतर पोलिसांनी (Police) संशयित आरोपींच्या (Suspected) व त्यांचे साथीदार अजय एकनाथ चव्हाण रा.असारे, ता.खालापुर,जि.रायगड, मुळ रा. खांडवी,ता.गेवराई,जि.बीड), आकाश पंजाबराव चव्हाण (रा. होराळे, पो. वावोशी, ता. खालापुर, जि. रायगड, मुळ रा.युसगाव, जि.संभाजीनगर) सोमनाथ भानुदास चव्हाण (रा. भिलवली, ता. खालापुर, जि. रायगड, मुळ रा. ढालगाव, जामनेर, जि. जळगाव) आणि रोहिदास उर्फ बन्नी चव्हाण (रा. अजंग वडेल, ता. मालेगाव (फरार)) यांची अधिक चौकशी केली असता हे सर्वजण पाली पोलीस ठाणे (जि.रायगड) येथील दरोड्याच्या गुन्ह्यात अटक असल्याचे तपासात निदर्शनास आले.




