नाशिक | प्रतिनिधी | Satpur
जिल्ह्यातील इगतपुरी (Igatpuri) येथील अवैध क्रेडीट कार्ड रक्कम, कर्ज रिकव्हरी करणाऱ्या कॉलसेंटरवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Rural Police) छापा (Raid) टाकला आहे. या छाप्प्यात पोलिसांनी २४ लाख रुपयांचे कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल व सिमकार्ड हस्तगत केले आहेत.
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्याकडून नाशिक ग्रामीण पोलीस हद्दीत अवैधरित्या चालविण्यात येणारे विविध कॉल सेंटरची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने इगतपुरी पोलीस ठाण्याच्या (Igatpuri Police Station) पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांना व त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती.
त्यानुसार सोमवार (दि.१५ रोजी) सायंकाळी ६ वाजता मिनाताई ठाकरे संकुल इगतपुरी येथे अवैधरित्या चालणाऱ्या कॉल सेंटरवर छापा (Raid) टाकण्यात आला. यात क्रेडीट कार्डद्वारे दिले गेलेले कर्ज, गृह कर्ज व संबधित कर्जाची रिकव्हरी करण्याकरीता कर्ज खातेदार आणि त्यांचे नातेवाईक,मित्र,शेजारी,यांना बँकेकडील बनावट ओळख धारण करुन बैकायदेशीरपणे धमकीचे कॉल करुन त्यांच्याकडुन कर्ज वसुलीचा प्रयत्न केला जात असल्याची खात्री पटली.
यानंतर इगतुपरी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं.318 (4), 319 (2), 62 (5) माहिती व तंत्रज्ञान अधिनियमचे कलम ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याप्रकरणी अवैध कॉल सेंटर चालविणारे नरेंद्र शशिकांत भोंडवे (वय ३२ वर्ष, रा. महात्मा गांधी नगर, महालक्ष्मी मंदिर जवळ इगतपुरी) पारस संजय भिसे (वय २६ वर्षे रा.रमाबाई कॉलनी, प्रियदर्शनी चाळ कमिटी, घाटकोपर, मुंबई) या दोघांना अटक (Arrested) करण्यात आली असून, त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या कारवाईत (Aciton) पोलिसांनी २४ लाख ३२ हजार रुपये किमंतीचा कॉम्प्युटर, लॅपटॉप, विविध कंपन्यांचे मोबाईल फोन व सिमकार्ड असा मुद्देमाल जप्त केला आहे. तर या ठिकाणी ४० ते ५० कर्मचारी काम करत असल्याचे तसेच हे कर्मचारी अवैधरित्या कर्जखातेदारांचा वैयक्तिक डाटा संकलित करत असल्याचे दिसून आले. तसेच या कॉल सेंटरला स्थानिक नगर प्रशासनाचा वैध परवाना नसल्याचे निदर्शनास आले आहे. या कॉल सेंटरवर आर.बी.एल., एच.डी.बी. फायनान्स आणि ग्रो फायनान्स यांचे कर्जवसुलीकरिता काम करत असल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस ठाण्याचे नागेश मोहिते करत आहेत.
दरम्यान, सदरची कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या सुचनेनुसार इगतपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव, पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, सायबर पोलीस ठाण्याचे नागेश मोहितेसह पथकातील गणेश परदेशी, निलेश देवराज, विनोद गोसावी, अभिजीत पोटींदे, राहुल साळवे आदींनी संयुक्तपणे केली आहे.





