सिन्नर | विलास पाटील | Sinnar
एखाद्यावर मोठं अरिष्ट येऊ घातलंय, त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी मोठी पूजा करावी लागेल असं सांगत खरात अनेकांना गिऱ्हाईक बनवायचा. गेल्या २०-३० वर्षांपासून त्याच्या अशा पूजांच्या अनेक सुरस कथा त्याच्या भक्तांमध्ये चर्चिल्या जात होत्या. नाशिकला पंचवीस वर्षांपूर्वी करिअरवर मार्गदर्शन करणाऱ्या सिन्नर तालुक्यातीलच (Sinnar Taluka) एका खासगी क्लास चालकाला धंद्यातल्या बरकतीसाठी त्याने अशाच एका पूजेचा मार्ग सुचवला होता. क्लासच्या जागेत दोघा पती-पत्नीला बसवत त्याने सायंकाळानंतर उशिरा पूजा विधी केला होता. या पूजेच्या वेळी कुत्र्याचा बळी दिल्याची चर्चा होती, रक्ताळलेल्या त्या रात्रीचा सारा तमाशा खिडकीतून क्लासच्याच काही मुलांनी पाहिला. घाबरगुंडी उडालेल्या या मुलांनी तेथून धाव घेत पंचवटी पोलीस ठाणे (Panchvati Police Station) गाठले होते. त्यावेळी तेथे कार्यरत असलेल्या माळोदे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने खरातच्या विरोधात गुन्हाही दाखल केला होता. त्या काळात कुठलीही तक्रार थेट स्टेशन डायरीला नोंदली जायची नाही. साध्या कोऱ्या कागदावर तक्रार नोंदली जायची.
अटक (Arrested) होण्याच्या भीतीने खरातने त्यावेळी आपल्या लोकप्रतिनिधीसोबत संपर्क साधून या भानगडीतून वाचवण्याची विनंती केली होती. त्यावेळी विधानसभेचे अधिवेशन सुरू असल्याने हा लोकप्रतिनिधी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊ शकत नव्हता, त्याने नाशिकला स्थायिक असलेल्या सिन्नर तालुक्यातीलच आपल्या एका कार्यकर्त्याला पोलीस ठाण्यात पाठवून दिलेली फिर्याद फाडून टाकण्याची कामगिरी दिली होती. तक्रार करणाऱ्या कल्याणच्या दोन तरुणी आणि कोपरगावच्या एका तरुणाला या अघोरी भक्तीतून बाहेर यायला बरेच दिवस लागल्याची चर्चा होती. पुढे याच क्लास चालकाने खरातच्याच सल्ल्यावरुन क्लासमधीलच एका तरुणीबरोबर दूसरा विवाहदेखील केला होता अशी आठवण अनेक नाशिककर सांगतात. मुलीचे लग्न जमत नाही, लग्न होऊन इतकी वर्ष झालीत. मात्र, अजूनही घरात पाळणा हलत नाही अशा समस्या अनेक घरांमध्ये असतात. प्रत्येक आई-वडिलांच्या भावनांशी जोडलेल्या या समस्या आहेत. त्यामुळे अनेक आई वडील यावर मार्ग शोधण्यासाठी खरातकडे जायचे. त्यासाठी घरातचं एक पूजा विधी करावा लागेल, असा तो भासवायचा आणि कितीही खर्च येणार असला तरी तो विधी करण्यासाठी काही आई-वडील तयारही व्हायचे. ठरल्याप्रमाणे खरात त्या घरी पोहोचायचा.
आधीच सांगितलेल्या वस्तू आलेल्या असायच्या त्यातून पूजा मांडायचा. पूजेला मुलीला बसवायचा आणि आई-वडिलांना त्यांच्याच घरातून बाहेर जायला सांगायचा, घरातवर आंधळी श्रद्धा असलेले आई-वडीलही गुपचूप घराच्या, फ्लॅटच्या दरवाज्याच्या बाहेर जाऊन तास-दोन तास मालदार-चोपदारसारखे जाऊन बसायचे. मुलीला कळायला लागल्यापासून पाच मिनिटही तिला क्लासला, एकटे न सोडणारे, व स्कूलला पहाटे रात्री स्वतःच्या मोटरसायकलवर नेऊन सोडणारे, पुन्हा घ्यायला जाणारे आई-वडील इथे डोळे झाकून विश्वास ठेवायचे आणि आपल्या ‘काळजाचा तुकडा त्याच्या स्वाधीन करायचे, अशा अनेक पूजा सिन्नरमध्ये, नाशिकमध्ये झाल्याची चर्चा असून त्यातील किती मुलींचे विवाह जुळले, किती विवाहित मुलींना बाळ झाले याची चर्चा कधी झाली नाही, मात्र, अशा विधीसाठी जाणाऱ्यांची संख्या नंतर वाढल्याचीच चर्चा ऐकायला यायची. तालुक्यातल्याच एका पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तरुणाचा अपघात झाला. गंभीर जखमी झालेल्या या तरुणावर नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. अशावेळी कोणत्याही रुग्णाच्या नातेवाईकाला देव आठवतो. मात्र, अनेकांना खरातमध्येच देव दिसायचा. या रुग्णाच्या कुटुंबियांना कुणीतरी खरातचा दरवाजा ठोठावण्याचा सल्ला दिला, त्यावेळी तरुण वाचण्याची शक्यता कमी असल्याचे त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर सांगत होते.
आमच्याकडून होतील तेवढे आम्ही प्रयत्न करत आहोत, शेवटी सारे ईश्वराच्याच हातात असल्याचे रुग्णांचे देव असणारे डॉक्टर सांगत होते. रुग्णाच्या कुटुंबातील काहींनी खरातला गाठले. काहीही करून मुलाला वाचवायचे साकडे घातले. तीन दिवसात मुलगा शुद्धीवर येईल असे म्हणत त्याच्या उशाखाली ठेवायला एक वस्तू पुडीत बांधून दिली. पुडी उघडून न पाहता उशीखाली ठेवायला सांगितले. रुग्णाचे कुटुंब रुग्णालयात गेले. तेव्हा रुग्णाची परिस्थिती अजूनच गंभीर बनली होती. मोठ्या विश्वासाने ही पुडी रुग्णाच्या उशीखाली ठेवण्यात आली. त्यानंतर काही तासांनी रुग्णाचा मृत्यू (Death) झाला होता. डॉक्टरांनी बॉडी घरी घेऊन जायला सांगितली. मात्र, कुटुंब ऐकायला तयार नव्हते. अजून २४ तास वाट बघण्याची त्यांची मानसिकता होती. ते डॉक्टरांचे ऐकेनात. शेवटी सिन्नरच्याच काही शहाण्या सुरत्या माणसांनी येऊन त्यांना सत्य स्वीकारण्याची विनंती केली. जड अंतःकरणाने त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला, उशाखालची वस्तु पाहण्याचा काहींना मोह झाला. पुडी उघडून बघितली असता त्यात एका प्राण्याचे दोन पाय कापलेल्या अवस्थेत ठेवलेले होते. कोणी ते घुबडाचे पाय असल्याचे सांगत होते. शहाण्या सुरत्यांना ते कोंबडीचे पाय ओळखायला वेळ लागला नव्हता. दवाखान्याच्या बिलाबरोबरच खरातचंही भलं मोठं बिल या कुटुंबाला भरावं लागल्याची चर्चा त्यावेळी होती.
उरलचे पितळ पडले उघड
वैदू समाजातला एक कार्यकर्ता सिन्नरमधल्याच एका भक्ताच्या आग्रहाखातर खरातला भेटायला गेला होता. चमत्काराच्या नावाखाली आयुर्वेदातीलच काही जड़ी-बूटी आणि जंगली जनावरांच्या शरीराचे छोटे-मोठे अवयव खरातने या कार्यकर्त्याला दाखवले. हे सर्वच लहानापासून पहात आलेल्या या कार्यकर्त्यांनी वस्तू पाहून त्याचे नाव सांगायला सुरुवात करताच खरात चांगलाच संतप्त झाला होता. तिथे बसलेल्या भक्तांसमोर आपलं गुपित उघडं पडू लागल्यानंतर याला पहिले इथून घेऊन जा नाहीतर…. असा इशारा खरातने दिला. त्यामुळे भयभीत झालेल्या त्याच्या भक्ताने या कार्यकर्त्याला हात धरून बाहेर आणल्याचे आजही या कार्यकर्त्यांसह त्याचे इतर सोबतीही सांगतात.





