नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सोशल मीडिया (Social Media) आणि इंटरनेटच्या (Internet) माध्यमातून लहान मुलांचे अश्लिल फोटो, व्हिडिओ (चाईल्ड पोर्नाेग्राफी) अपलोड आणि शेअर करणाऱ्यांविरुद्ध केंद्र सरकारसह नाशिक शहर सायबर पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) महाराष्ट्र सायबरला (Maharashtra Cyber) दिलेल्या माहितीच्या आधारे नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात संशयित साेशल मिडीया अकाऊंटवर नव्याने गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
अमेरिकेतील (America) ‘नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉइटेड चिल्ड्रेन’ ही संस्था जगभरात बेपत्ता मुलेमुली आणि लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या विरोधात काम करते. ही संस्था सोशल मीडिया साइट्स, डार्कवेब, फेसबुक आणि अन्य यूआरएलवर बारीक लक्ष ठेवून असते. एखादा यूजर अल्पवयीन मुलामुलींचे अश्लिल व्हिडिओ किंवा फोटो अपलोड किंवा डाउनलोड करतो, तेव्हा संस्थेची यंत्रणा त्या आयपी ॲड्रेससह माहिती भारताच्या एनसीआरबीकडे पाठवते.
हे देखील वाचा : Maharashtra Cyber News : ‘एस फोर सी’ ठेवणार नजर; महाराष्ट्र सायबर बनले राज्य सायबर गुन्हे समन्वय केंद्र
एनसीआरबी (NCRB) ही माहिती संबंधित राज्याच्या सायबर सेलला सुपूर्द करते. यानंतर संबंधित शहर व जिल्ह्यातील सायबर पाेलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २९४, माहिती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६७ (ब) आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायदा २०१२ चे कलम १५ नुसार गुन्हे नाेंद करते.
काय आहे चाईल्ड पोर्नाोग्राफी?
१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांचे, अल्पवयीन मुला-मुलींचे न्यूड, अर्धनग्न किंवा लैंगिक अत्याचार दर्शवणारे फोटो, व्हिडिओ किंवा डिजिटल कंटेंट तयार करणे, पाहणे, ते मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवणे किंवा सोशल मीडियावर पुढे शेअर/फॉरवर्ड करणे म्हणजे चाईल्ड पोर्नाोग्राफी किंवा ‘चाइल्ड सेक्शुअल ॲब्युज मटेरिअल’ होय.
सायबर पोलिसांचे आवाहन
सोशल मीडिया, व्हॉट्सॲप ग्रुप किंवा टेलिग्रामवर असा कोणताही संशयास्पद किंवा बालकांच्या अश्लिलतेशी संबंधित कंटेंट आल्यास तो पुढे फॉरवर्ड न करता त्वरित डिलीट करा किंवा सायबर पोलिसांना कळवावे. सोशल मीडिया प्रोफाइल किंवा इंटरनेट कनेक्शन इतर कोणी गैरवापरासाठी वापरत नाही ना, याची दक्षता घ्यावी. अशा प्रकारची कोणतीही माहिती किंवा लिंक आढळल्यास राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल www.cybercrime.gov.in वर किंवा जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.
मुद्दे
-चाईल्ड पाेर्नाेग्राफीबाबत कठाेर भूमिका
-नाशिकमध्ये गेल्या दाेन वर्षांत ४२ हून अधिक गुन्हे
-संशयित यूजरची संख्ख्या ७० हून अधिक
-संशयितांचे अकाऊंट, यूआरएलवर कारवाई
-काेणताही अश्लिल कंटेन्ट शेअर, डाऊनलाेड, अपलाेड करु नये.




