नाशिक | प्रतिनिधी | Nashik
एखाद्या सराईत गुन्हेगाराला (Criminal) पकडण्यासाठी पोलीस (Police) बळाचा वापर करतात, पण स्वयंघोषित ‘कॅप्टन’ आणि त्याच्या अंकशास्त्राची मस्ती जिरवण्यासाठी नाशिक पोलिसांनी चक्क ‘सायकॉलॉजिकल गेम’ खेळला. मंत्रालयातून अटकेचे आदेश आले आणि अवघ्या काही तासांत अशोक खरातला (Ashok Kharat) त्याच्या ‘तृप्तबाला’ बंगल्याजवळ ‘युक्ती’ वापरुन बाहेर खेचून गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. ही कारवाई एखाद्या फिल्मी स्क्रिप्टपेक्षा कमी नव्हती.
बुधवारी रात्री ११ ते ११.३० वाजता कर्मयोगीनगर परिसर सामसूम होता. खरात हा अत्यंत चलाख आणि पळपुटा असल्याने त्याला उघड्यावर गाठणे पोलिसांसमोर आव्हान होते. थेट कारवाई केली असती तर तो निसटला असता किंवा भक्तांनी कल्ला मांडला असता. अशावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी व उपनिरीक्षक सदीप पवार यांनी ‘प्लॅन’ तयार केला. साध्या वेशातील पोलिसांनी खरातच्या बंगल्याला वेढा घातला. अचानक परिसरात दोन-तीन तरुण चोर आले, चोर आले! असे ओरडत धावू लागले.
शांततेचा भंग झाल्याने आणि घराबाहेर नक्की काय गोंधळ आहे, हे पाहण्याच्या कुतूहलापोटी खरात सावज बनून बाहेर आला. तो जसा घराबाहेर आला, तसा दबा धरून बसलेल्या पथकाने झडप घातली. ज्याला पकडण्यासाठी मंत्रालयापर्यंत हालचाली झाल्या, तो स्वघोषित कॅप्टन चक्क ‘हाफ बरमुड्यावर’ पोलिसांच्या ताब्यात होता. प्रतिकार करण्याची संधी तर सोडाच, पण त्याला काय घडतंय हे समजण्यापूर्वीच पोलिसांनी गाडीत टाकले. दरम्यान बलात्कार आणि फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्यात अडकलेल्या खरातच्या अंकशास्त्राचा सर्व अभ्यास पोलिसांच्या प्रॅक्टिकल खेळीसमोर फेल ठरला. हुशारीने आणि शस्त्रांशिवाय केलेल्या या ‘सर्जिकल स्ट्राईक’ मुळे खरातची रवानगी आता कोठडीत झाली आहे.
झोल काय?
ही कारवाई अतिशय जोखमीची होती. खरातची पार्श्वभूमी पाहता परिसरात भक्तांचा ताप किंवा तणाव निर्माण होऊ शकला असता. मात्र, पोलिसांनी अतिशय सूक्ष्म नियोजन करून ही मोहिम फत्ते केली. परिसरातील नागरिकांना नेमका काय ‘झोल’ झाला आहे, हे समजायला बराच वेळ लागला. सकाळी जेव्हा बलात्काराच्या गुन्ह्यात त्याला अटक झाल्याचे स्पष्ट झाले, तेव्हा पोलिसांच्या या ‘स्मार्ट’ कारवाईचे कौतुक झाले.





