मुल्हेर | वार्ताहर | Mulher
ऐतिहासिक साल्हेर किल्ल्याच्या पठारावर निर्जनस्थळी झालेल्या दुहेरी खुनाचा उलगडा करण्यास स्थानिक गुन्हे शाखा व जायखेडा पोलिसांना (Jaikheda Police) यश आले आहे. जमिनीच्या मालकीहक्कावरून सख्ख्या भावासह त्यास न्यायालयीन कामकाजात मदत करणाऱ्या साथीदाराचा गुप्त धनाचा साठा असल्याचे अमिष दाखवत किल्ल्यावर नेवून लाठ्याकाठ्यांसह कुऱ्हाडीने हल्ला चढवित व दगडाने ठेचून निघृण खून (Murder) करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच संशयितांना गजाआड केले आहे.
साल्हेर किल्ल्याच्या डोंगर पठारावर निर्जनस्थळी २२ नोव्हेंबर रोजी दोन इसमांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आले होते. या घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलीस ठाण्याचे सपोनि पुरूषोत्तम शिरसाठ यांनी घटनास्थळी धाव घेत मृतांच्या अंगावरील कपडे तसेच इतर साहित्यावरून त्यांची ओळख पटवली होती. रामभाऊ गोटीराम वाघ (६०, रा. गोपाळखडी, ता. कळवण) व नरेश रंगनाथ पवार (६३, कळवण) या दोघांची हे मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळीच उत्तरीय तपासणी वैद्यकीय अधिकाऱ्यांतर्फे केली गेली. या तपासणीत धारदार शस्त्रासह दगडाने ठेचून त्यांचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
या घटनेची जिल्हा पोलीसप्रमुख विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपअधिक्षक नितीन गणापुरे यांनी गंभीर दखल घेत तपासाबाबत स्थानिक गुन्हे शाखा व जायखेडा पोलिसांना निर्देश दिले होते.
मृत रामभाऊ वाघ व नरेश पवार हे कळवण परिसरातून सटाण्याकडे दुचाकीवर गेले असल्याची माहिती चौकशी दरम्यान मिळताच पोलिस पथकांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवित साल्हेर किल्ला व केळझर धरण परिसरात पाळत ठेवत संशयित सोमनाथ गोटीराम वाघ (५०), गोपीनाथ सोमनाथ वाघ (२८, दोघे रा. गोपाळखडी, ता. कळवण), विश्वास दामू देशमुख (३६, केळझर), शरद उर्फ बारकू दुगाजी गांगुर्डे (३०, रा. बगडू), तानाजी आनंदा पवार (३६, रा. खालप) या पाच संशयितांना ताब्यात घेत त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना (Police) दिली.
दरम्यान, सोमनाथ वाघ व रामभाऊ वाघ यांच्यामध्ये जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद होता व यामध्ये रामभाऊ यास त्याचा मित्र नरेश पवार हा न्यायालयात मदत करत होता. यामुळे संतापलेल्या सोमनाथ वाघ याने धनाचा साठा साल्हेर किल्ल्यावर आहे असे सांगून तेथे बोलवून घेत खून केला व मृतदेह पठारावर सोडून दुचाकीची विल्हेवाट लावल्याची माहिती संशयितांनी पोलिसांना दिली आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सपोनि संदेश पवार, उपनिरीक्षक दत्ता गांभीरे, जायखेडा निरीक्षक पुरूषोत्तम शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली पथकांनी हा खुनाचा गुन्हा उलगडण्यात यश मिळविले आहे.