नाशिक | Nashik
अंकशास्त्राच्या नावाखाली राजकारणी, उद्योजक आणि महिलांची फसवणूक करणाऱ्या स्वयंघोषित कॅप्टन भोंदू अशोक खरातला (Ashok Kharat) आज (रविवारी) पोलीस कोठडी संपत असल्याने नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर न्यायालयाने पुन्हा एकदा खरातच्या पोलीस कोठडीत वाढ करत त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याआधी खरातला सात दिवसांची, त्यानंतर पाच दिवसांची आणि आता चार दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाकडून सुनावण्यात आली आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातला आज न्यायालयात हजर करणार; SIT कडून कोठडीची मुदत वाढवून मागितली जाणार?
यावेळी एसआयटी आणि पोलिसांकडून (SIT and Police) खरातच्या मालमत्तेची चौकशी करायची असल्याने पोलीस कोठडी (Police Custody) वाढवून देण्याची मागणी केली. यावेळी न्यायालयात एसआयटीकडून खरातच्या कार्यालयातून जप्त केलेले लॅपटॉप, पेनड्राईव्ह यासह आदी कागदपत्रे ठेवण्यात आली. तर खरातच्या वकिलांनी मालमत्तेसंदर्भात याआधीही युक्तिवाद करण्यात आल्याने उर्वरित तपासासाठी कोठडीची गरज नसल्याचे म्हणत कोठडी वाढवून देऊ नये, असे म्हटले. तसेच पोलिसांकडून ठोस माहिती दिली जात नसल्याचेही खरातच्या वकिलांनी सांगितले.
हे देखील वाचा : Ashok Kharat Case : माणिकराव कोकाटेंना मंत्री करू नये म्हणून खरातचा सुनील तटकरेंना फोन; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप
तर सरकारी वकिलांनी पुढे युक्तिवाद करताना म्हटले की, खरातच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर झाला आहे. मात्र, त्यामध्ये कोणाचे नंबर कोणाच्या नावाने सेव्ह आहेत हे आरोपीच सांगू शकतो. त्यामुळे त्याची तीन दिवसांची कोठडी वाढवून द्यावी. तसेच आरोपीचे इतर जे साथीदार आहेत त्यांची चौकशी करायची आहे, असेही त्यांनी न्यायालयासमोर सांगितले. तसेच खरातच्या जंगम मालमत्तेची चौकशी करायची असून, याप्रकरणात खरात मास्टर माइंड आहे. हा संवेदनशील गुन्हा असून, अनेक महिलांची फसवणूक (Fraud) झाली आहे, असा युक्तिवादही सरकारी वकिलांनी केला. तर पीडितेच्या वकिलांनी खरात तपासात सहकार्य करत नसून, पोलीसांना खरी उत्तरे देत नाही, असे म्हटले.
हे देखील वाचा : Ashok Kharat Case : खरातची ‘शस्त्र कुंडली’ उघड; पोलीस रेकॉर्डमधून पुरावेच गायब
दरम्यान, न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद (Argument) ऐकून घेतल्यानंतर संशयित आरोपीच्या निकालाचे वाचन केले. यानंतर खरातला चार दिवसांची म्हणजे बुधवार (दि.०१ एप्रिल) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे आता पुढील चार दिवस एसायटीकडून खरातची आणखी कसून चौकशी केली जाणार आहे. यात नवी कुठली माहिती एसआयटीच्या तपासात समोर येते हे बघणे महत्वाचे असणार आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : खरातच्या ‘कुकर्मा’ मागे राजकीय वरदहस्त? रुपाली चाकणकरांवर ‘सेटलमेंटचा’ आरोप!





