सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar
सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यातील (Sinnar MIDC Police Station) उपनिरिक्षक राजू ब्रिजलाल पाटील (४२) याला एक लाखाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सोमवारी (दि. २४) दुपारच्या सुमारास रंगेहात पकडले.
तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, या गुन्ह्यात सदर मुलास एमआयडीसी पोलिसांनी अटक केलेली आहे. या गुन्ह्यात त्या मुलास वाढीव पोलीस कोठडी (Police Custody) न मागण्यासाठी, आरोपी मुलाला लवकरात लवकर जामीन मिळण्यासाठी व तपासात सहकार्य करुन चार्जशिट दाखल करतेवेळी केस कच्ची करण्यासाठी पाटील यांनी तक्रारदाराकडे रविवारी (दि. २३) १ लाख ६० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारदार याने एवढे पैसे देण्यात मनाई केल्यानंतर तडजोडीअंती १ लाखांची रक्कम देण्याचे तक्रारदाराने मान्य केले.
मात्र, यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाची संपर्क साधत याबाबत माहिती दिली. लाचलुचपत विभागाचे (ACB) पोलिस उपअधीक्षक सुरेश शिरसाठ, हवालदार पंकज पळशिकर, प्रमोद चव्हाणके, योगेश शिंदे यांच्या पथकाने सर्व बाबींची खात्री करत एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारातच सापळा रचला. तक्रारदाराने पंचासमक्ष लाचेची रक्कम राजू पाटील यांच्या हातात देताच लाचलुचपतच्या पथकाने पाटील यांना रंगेहात पकडले. यानंतर पथकाने पाटील यांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात सिन्नर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन-१९८८ चे कलम ७ नुसार गुन्हा करण्यात आला आहे.




