नाशिक | प्रतिनिधी | Nashik
एका ७० वर्षीय नराधम वृद्धाने आपल्याच घरी कामाला असणाऱ्या केअरटेकर वृद्धेच्या १५ वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार (Rape) केला. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे.
पंचवटी भागात (Panchvati Area) राहणारी पीडित मुलगी आणि तिची आजी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. पीडितेची आजी वृद्ध संशयिताच्या घरी सन २०२२ मध्ये ‘केअरटेकर’ म्हणून काम करत होती. याच काळात संशयित सूर्यकांत वाघ उर्फ आण्णा (वय ७०, रा. कल्पतरूनगर, अशोका मार्ग) याने पीडित मुलीला एका खोलीत नेऊन, तिच्यावर अत्याचार केले.
हे देखील वाचा : Nashik TCS Case : चैनानीसह पाच संशयितांचा कारागृहातील मुक्काम वाढला; आगामी सुनावणी ‘अशा’ होणार
एवढेच नव्हे तर, पीडितेने आरडाओरडा करू नये म्हणून तिचे तोंड दाबून जीवे मारण्याची आणि आजीला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली. या धाकामुळे पीडितेने प्रदीर्घ काळ हे भयानक वास्तव कोणालाही सांगितले नाही. सध्या याप्रकरणी पोक्सो कायद्याच्या (Pocso Act) कलम ४, ६, ८, १२ आणि भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निर्भयामुळे झाला उलगडा
काही दिवसांपूर्वी पीडित मुलगी गंगाघाटावर अत्यंत निराधार आणि हताश अवस्थेत पंचवटीच्या निर्भया पथकाला आढळून आली. पथकातील महिला पोलिसांनी तिची विचारपूस केली असता, तिने आपल्यासोबत घडलेला हा भीषण प्रकार कथन केला. त्यानंतर तिला तत्काळ आधाराश्रमात दाखल करण्यात आले. तिची वैद्यकीय तपासणी केली असता, तिच्यावर अत्याचार झाल्याच्या प्रकरणाला दुजोरा मिळाला. पथकाने ही माहिती पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांना दिली. गांभीर्य ओळखून त्यांनी पीडितेशी संवाद साधला. प्राथमिक चौकशीनंतर, घटनास्थळ मुंबई नाका हद्दीत असल्याने तिथे गुन्हा वर्ग करण्यात आला.
अटकेची कार्यवाही सुरू
घटनेच्या वेळी ७० वर्षांचा असलेला हा नराधम आता सन २०२६ मध्ये ७४ वर्षांचा झाला असून, पोलिस उपनिरीक्षक मुस्तफा शेख सखोल तपास करत आहेत. नराधम वृद्धास काहीतरी आजार असून त्याला अटक करण्यासाठी कायदेशीर कार्यवाही केली जात असून, पीडितेच्या वयाचा तांत्रिक तपासही केला जात आहे.




