नाशिक/नाशिकरोड | प्रतिनिधी
गुन्हेगारांचा सहवास, बेकायदेशीर शस्त्रांचे आकर्षण आणि समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) रिल्स बनवून (Social Media Reels) भाईगिरीचे प्रदर्शन (Bhaigiri) करण्याची विकृती आता नवोदित जेन-झी (Gen-Z) पिढीला तुरुंगाच्या दारात पोहोचवत असल्याचे वास्तव नाशिकमधून (Nashik) समोर आले आहे. मित्राच्या सांगण्यावरून गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार (Firing From Local Made Gun) करून त्याचा व्हिडिओ बनवणाऱ्या कोमल रामदास गायकवाड (१९, रा. संभाजीनगर, एकलहरा ट्रॅक्शनरोड, नाशिकरोड) या तरुणीला नाशिकरोड पोलिसांनी (Nashik Road Police) अटक केली आहे.
नाशिकरोड भागातील सराईत गुन्हेगार भूषण उर्फ स्वप्नील सुनील गोसावी (२५, रा. त्रिमूर्ती चौक, सिडको) याच्याकडे बेकायदेशीर गावठी कट्टा होता. १४ जुलै २०२६ रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास एकलहरारोडवरील वैभव हॉटेलच्या मागील वडाच्या झाडाजवळ भूषणने कोमलला हा कट्टा दिला. त्यामध्ये जिवंत काडतूस (राउंड) टाकून मौज-मजा म्हणून हवेत गोळीबार करण्यास सांगितले.
कोमलने कसलाही विचार न करता हवेत गोळीबार केला तर भूषणने तिच्या या कृत्याचा स्वतः च्या मोबाइलमध्ये व्हिडिओ शूट केला. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नाशिकरोड पोलिसांनी ५ ऑगस्ट २०२६ रोजी कोमलला ताब्यात घेतले. तिची चौकशी करून मोबाइल तपासला असता त्यामध्ये हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ आढळला. पोलिसांनी सुमारे २० हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाइल आणि चार जीबीचा पेनड्राइव्ह जप्त केला आहे.
Shalartha ID Scam: बोगस मान्यतांचा भांडाफोड होणार! पोलिसांचा मोर्चा आता कागदपत्रांच्या पडताळणीकडे
याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार महेंद्र दिलीप जाधव (३६) यांच्या फिर्यादीवरून भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३(२५) सह महाराष्ट्र पोलीस कायदा १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी (दि. ५) संध्याकाळी कोमलला अटक करण्यात आली असून न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील मुख्य संशयित भूषण गोसावी याला गुन्हे शाखेच्या गुंडविरोधी पथकाने तीन दिवसांपूर्वीच राहुरीतून बेड्या ठोकल्या आहेत.
रील्सची क्रेझ अन् गुन्हेगारीची दलदल
आजची तरुण पिढी प्रसिद्धी आणि तात्पुरत्या थ्रिलसाठी शस्त्रांसोबत रिल्स बनवून गुन्हेगारांचे उदात्तीकरण करत आहे. अवघ्या १९ वर्षांच्या तरुणीने सराईत गुन्हेगाराच्या सांगण्यावरून थेट गोळीबार करण्याचे धाडस दाखवणे, ही गंभीर सामाजिक विकृती मानली जात आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या संगतीवर आणि मोबाइलमधील हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.
कोमल ही महाविद्यालयीन विद्यार्थिनी.
कोमल व भूषण मित्र-मैत्रीण.
घटना १४ जुलैची, १५ दिवसांनी गोळीबार उघड
भूषणवर यापूर्वी नाशिकरोड व उपनगरला गोळीबाराचे गुन्हे.
वीस हजारांचा मोबाइल, पेनड्राइव्ह (व्हिडिओ क्लिपसह) जप्त.
तपास हवालदार पाटील यांच्याकडे




