नाशिक | प्रतिनिधी | Nashik
विसेमळा ते रामवाडी येथील गोळीबार (Vise Mala to Ramvadi Firing Case) प्रकरणामुळे भाजप नेते सुनील किसनराव बागुल (Sunil Bagul) यांच्या अडचणीत आता पुन्हा वाढ झाली आहे. या गोळीबारात बागुल म्हणजेच ‘सुकिबा’ ग्रुपच्या धर्मवीरांचा सहभाग असल्याची चर्चा सुरु असून त्यांची सखोल चौकशी होणार आहे. त्यासाठी गुन्हेशाखा पथके त्यांच्या मागावर असून शोध घेत आहेत. दरम्यान, अटक होऊ नये, म्हणून ते पसार झाल्याचे कळते.
भाजपात (BJP) असलेल्या पण, गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा गंभीर गुन्ह्यांत आढळलेल्या उद्धव निमसे आणि जगदीश पाटील यांच्यानंतर बागुलांचा ‘नंबर’ लागण्याची शक्यता आहे. विसेमळा ते रामवाडी मार्गावर २५ सप्टेंबर रोजी घडलेल्या सचिन साळुंकेवरील गोळीबारानंतर गुन्हेशाखेने तपासाअंती बागुल यांचे पुतणे अजय, गौरव तसेच, कट्टर समर्थक मामा राजवाडे, अमोल पाटील, अजय बोरिसा व इतरांना अटक केली. शुक्रवारी अजय बागुल व अजय बोरिसा यांना न्यायालयाने पाच दिवसांची वाढीव कोठडी सुनावून उर्वरित संशयितांना न्यायालयीन (Custody) कोठडी सुनावली. असे असतानाच सराईत व गँगचा तुकाराम चोथवे पसार असून, त्याच्यासह सुनील बागुल यांचा शोध सुरु असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, बागूल यांच्या ‘श्रमिक माथाडी बोर्ड गार्ड संघटने’च्या आडून ‘रंगदारी’म्हणजेच खंडणी वसूल करणारा त्यांचा गुंड अनिल शेंडगे याला गंगापूर पोलिसांनी अटक केली असून, तो पोलीस कोठडीत (Police Custody) आहे. या गोळीबाराच्या घटनेव्यतिरिक्त ‘श्रमिक’ची दुकानदारी कशी चालविली जाते, सुरु होती, याचा उलगडा पोलिसांकडे तो करीत आहे, त्यातून अनेक महत्त्वाच्या बाबी पोलिसांनी हेरल्याचे समजते.
‘भारदस्त’ खुशीत
बागुलांच्या गळ्याभोवतालासह साम्राज्याचा ‘बुरुज’ ढासळण्याची दाट भीती अनेकांना आता वाटू लागली आहे. तो ढासळू नये आणि पुतण्या अजय बागुलसह पंटरांना ‘माफी’ असावी म्हणून बागुल यांनी थेट जळगाव आणि मुंबईवारी केल्याचे समजते. दरम्यान, सुरु असलेल्या ‘पोलिसी’ कारवाईमुळे अशांत ‘रामवाडी’ शांत झाल्याचे दिसून येते आहे. दुसरीकडे बागुलांचा एक ‘भारदस्त’ शेजारी दिवाळीपूर्वीच ‘डबल धमाके’ फोडत आहे, असे कळते.




