Saturday, August 15, 2026
HomeनाशिकNashik Crime News : गोसावीची 'पैज' पोलिसांच्या पायदळी; सराईत भूषणचा फिल्मी स्टाईल...

Nashik Crime News : गोसावीची ‘पैज’ पोलिसांच्या पायदळी; सराईत भूषणचा फिल्मी स्टाईल पाठलाग करून मुसक्या आवळल्या

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

“मला कोणीच पकडू शकत नाही” अशी फुशारकी मारणारा आणि समाजमाध्यमांवर स्वतःला नायक समजणारा सराईत संशयित भूषण उर्फ स्वप्निल गोसावी याच्या मुसक्या आवळण्यात नाशिक शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाला यश आले आहे. नाशिकरोड व उपनगर परिसरांत (Nashik Upnagar Area) बंदुकीचा धाक दाखवून लुटमार करणे, वाहनांची तोडफोड आणि हवेत गोळीबार करून दहशत पसरवणाऱ्या या सराईताला नाशिक शहर पोलिसांनी (Nashik City Police) अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी-कोल्हार मार्गावर पाठलाग करून बेड्या ठोकल्या.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : नाशिकरोड-उपनगर हद्दीतील गोळीबार प्रकरणी दोन सराईत जेरबंद

​नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्यानंतर संशयित पसार झाला होता. पोलिसांना चकवा देण्यासाठी तो माेबाईलचे नेटवर्क वापरणे टाळत होता आणि केवळ स्थानिक वायफाय वापरत होता. तसेच, हॉटेल किंवा विश्रामगृहात न राहता स्वतःच्या चारचाकी वाहनातच झोपत हाेता. या लपाछपीमुळे त्याचा अहंकार वाढला होता आणि त्याने पोलिसांना थेट आव्हान देणारा दूरध्वनी संवादाचा ध्वनीमुद्रित संदेश जारी केला होता. मात्र, नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) व पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण व सहाय्यक पाेलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंड विरोधी पथकाचे प्रभारी उपनिरीक्षक संदीप पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या आव्हानाचा पाठलाग सुरू केला.

संशयित अहमदनगर, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, संगमनेर, अकोले असा ठिकठिकाणी मार्ग बदलत होता. निवासाच्या उपाहारगृहातील सीसीटीव्ही फूटेज आणि स्थानिक खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी राहुरी साखर कारखान्याजवळ संशयिताची चारचाकी गाडी गाठली. पोलिसांचे वाहन पाहताच गाेसावीने गाडीचा वेग वाढवून पळण्याचा प्रयत्न केला. अंधाऱ्या रात्री कच्च्या रस्त्यावरून अत्यंत वेगाने जाणाऱ्या गाेसावीच्या कारला पोलिसांनी आपल्या वाहनाने सिनेनाट्यमय रीतीने आडवे मारून थांबवले आणि गाडीत शिरुन त्याला ताब्यात घेतले. काही वेळापूर्वी ‘पैज’ लावणारा हा गुन्हेगार (Criminal) पोलिसांचा कडक आवाज ऐकताच केविलवाणा झाला.

​टोळीतील साथीदारांवरही कारवाईची कुऱ्हाड

​या धडक कारवाईत मुख्य आरोपी भूषण उर्फ स्वप्निल गोसावी (वय २९, रा. सिडको, नाशिक) याच्यासह त्याचा साथीदार आकाश दीपक गायकवाड (वय २५, रा. शिर्डी नगर रस्ता, अहिल्यानगर) याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पोलिसांचा दणका बसताच टोळीतील तिसरा संशयित आयुष शिंदे याने उपनगर पोलीस ठाण्यात स्वतःहून शरणागती पत्कारली, तर उर्वरित साथीदार स्वप्निल मोरे याचा पोलीस पथक वेगाने शोध घेत आहेत.

मुद्देमाल आणि जप्ती

-​देशी बनावटीचा कट्टा (पिस्तूल): १ लाख रुपये किंमतीचा
-​जीवंत काडतूस (गोळ्या): ४ हजार रुपये किंमतीचे ०४ काडतूस
-​चारचाकी वाहन: १० लाख रुपये किंमतीची ‘स्कोडा’ गाडी (एमएच ३९ जे ३१४७)
-​एकूण जप्त माल: ११ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल पंचनाम्याद्वारे जप्त

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 76 प्रलंबित याचिकांवर ‘प्रशासकीय तोडगा’; मनपा आयुक्तांचा पुढाकार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिका प्रशासनाच्या विविध निर्णयांविरोधात कर्मचारी व निवृत्त कर्मचार्‍यांनी न्यायालयात दाखल केलेल्या आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या याचिकांचा प्रशासकीय पातळीवर तोडगा काढण्यासाठी आयुक्त...