बोलठाण | वार्ताहर | Bolthan
नांदगाव तालुक्यातील (Nandgaon Taluka) प्रमुख व्यापारी पेठ असलेल्या घाटमाथ्यावरील बोलठाण गावात (Bolthan Village) काल मध्यरात्री चोरट्यांनी (Thieves) अक्षरशः धुडगूस घातला. दोन सुवर्ण अलंकार विक्रीच्या दुकानांसह पाच घरे फोडत कपाटासह इतर साहित्यांची नासधूस करत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. आज सकाळी या चोरींचा प्रकार उघडकीस येताच गावासह परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
दोन सराफा दुकानांसह पाच घरे (House) फोडत चोरट्यांनी ऐवज लंपास केल्याची माहिती मिळताच नांदगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासास प्रारंभ केला. श्वान तसेच ठसेतज्ज्ञांचे पथक घटनास्थळी पाचारण करण्यात येऊन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न पोलीस (Police) अधिकाऱ्यांतर्फे सुरू करण्यात आला आहे. व्यापारी पेठ असलेल्या गावात मध्यरात्रीतून सात ठिकाणी चोरट्यांनी या घरफोड्या केल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. गत काही दिवसांपासून घाटमाथ्यावर थंडीचा कडाका वाढला असल्याने रात्री शुकशुकाट पसरत असल्याची संधी साधत चोरट्यांनी हा डाव मध्यरात्रीतून साधला असावा, असा कयास व्यक्त केला जात आहे.
बुधवारी पहाटे ३ ते ४:३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गावातील बाजारपेठेत असलेल्या आकाश अलंकार व महालक्ष्मी अलंकार या सराफी पेढ्यांचे शटर तोडून दुकानात असलेले सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. आकाश अलंकार या दुकानाचे शटर फोडत चोरट्यांनी चांदी व सोन्याचा ऐवज लंपास केल्याची माहिती क्षितिज सोनार यांनी दिली. दुकानातील फर्निचर तसेच कपाटाची देखील कटरच्या सहाय्याने चोरट्यांनी तोडफोड केल्याचे दिसून आले. महालक्ष्मी अलंकारचेदेखील शटर तोडून चोरट्यांनी दुकानातील चांदीचे दागिने तसेच ग्राहकांचा मजुरीकामासाठी आलेला दागिन्यांचा ऐवज लंपास केला असल्याची माहिती दुकानाचे चालक कैलास बाविस्कर यांनी दिली.
हे दोन सराफी दुकान (Shop) फोडल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा अण्णासाहेब पाटील, राजेंद्र डोंगरे, दीनानाथ डोंगरे श्रीकांत चव्हाण, शौकत सय्यद यांच्या घरांकडे वळवला. घरांचा कडीकोयंडा व कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह इतर ऐवज लंपास केला. घर फोडून चोरट्यांनी कपाटात ठेवलेली रोख रक्कम लांबवल्याची माहिती राजेंद्र डोंगरे यांनी दिली. अण्णासाहेब पाटील यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाट व इतर साहित्यांची नासधूस करत रोकड व ऐवज लांबवला. अण्णासाहेब पाटील हे पुण्यात राहत असल्याने त्यांना ही माहिती मिळताच ते बोलठाण येथे आले. घरातील कपाटांची नासधूस करत चोरट्यांनी रोकड व ऐवज लांबवल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित तीन बंद असलेल्या घरांचे कुलूप व दरवाजे तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला व कपाट व इतर साहित्याची नासधूस केली. मात्र या तीन घरांमध्ये चोरट्यांच्या पदरी काही पडले नाही.
पहाटे तीन ते साडेचार वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी हा प्रकार केला असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून निदर्शनास आले. दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी तोंडावर कपडे बांधले असल्याने त्यांचा चेहरा दिसून आला नाही. सराफी पेढीतून दागिने बॉक्ससह चोरट्यांनी लांबवले. सदरचे रिकामे बॉक्स संभाजीनगरकडे जाणाऱ्या रोहिल्या रस्त्यावर पडलेले पोलिसांना मिळून आले. त्यामुळे या भागातूनच चोरट्यांनी पलायन केले असावे, असा संशय पोलिसांना आहे.दोन सराफी पेढींसह पाच घरे चोरट्यांनी फोडत ऐवज लंपास केल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, स.पो.नि. सुनील बढे, उपनिरीक्षक बहाकर यांनी पोलिसांसमवेत बोलठाण येथे धाव घेत तपासास प्रारंभ केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने श्वान व ठसेतज्ज्ञांचे पथक पाचारण करण्यात आले होते. श्वान पथकाने सराफी पेढी व घराजवळच रस्त्यापर्यंत चोरट्यांचा माग काढला. पुढे मात्र ते घुटमळले. यामुळे या ठिकाणाहून चोरटे दुचाकीने पसार झाले असावेत, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
दरम्यान, या घरफोडीप्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात (Nandgaon Police Station) गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. सराफी पेढी व घरातून किती ऐवज लंपास झाला याची माहिती पोलिसांतर्फे घेतली जात आहे. ठसेतज्ज्ञ तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरांचा माग काढला जात आहे. या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून तपासास वेग दिला आहे. लवकरच चोरट्यांना जेरबंद केले जाईल, अशी माहिती पो.नि. प्रीतम चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.