Tuesday, July 21, 2026
Homeक्राईमNashik Crime News : ३९ लाखांचा १० चाकी हायवा चोरणारा चोरटा १२...

Nashik Crime News : ३९ लाखांचा १० चाकी हायवा चोरणारा चोरटा १२ तासांत गजाआड ; छत्रपती संभाजीनगरमधून आरोपींना बेड्या

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati 

शहरातील वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नाशिक पोलीस (Nashik Police) यंत्रणा हायअलर्टवर असतानाच, आडगाव पोलीस ठाण्याच्या (Aadgaon Police Station) गुन्हे शोध पथकाने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. लाखलगाव परिसरातील पेट्रोल पंपावरून चोरीला गेलेला तब्बल ३९ लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा १० चाकी हायवा ट्रक आडगाव पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत शोधून काढला आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथून दोन संशयित आरोपींना सिनेस्टाईल सापळा रचून अटक करण्यात आली असून, गुन्ह्यात वापरलेली डिझायर कारही जप्त करण्यात आली आहे. 

- Advertisement -

लाखलगाव येथील एच. पी. पेट्रोल पंपावर पार्क केलेला रमेश बळवंत कहांडळ यांचा १० चाकी हायवा ट्रक (क्रमांक एमएच १५ एचएच ७६६१) दि. १६ जुलै रोजीच्या रात्री ते १७ जुलैच्या सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता. याप्रकरणी १७ जुलै रोजी रात्री आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांची (Police) चक्रे वेगाने फिरली.

४६ सीसीटीव्ही फुटेज आणि ‘ते’ धागेदोरे

वरिष्ठांच्या आदेशानुसार आडगाव गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार मनोज परदेशी, अक्षय गोसावी, प्रितम बोराटे आणि रविंद्र लिलके यांचे पथक तात्काळ तपासासाठी रवाना झाले. संशयीत मार्गावरील तब्बल ४६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आणि तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत हे पथक थेट छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचले.

करमाड पोलिसांच्या मदतीने ‘गेम ओव्हर’!

छत्रपती संभाजीनगरमधील करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका रस्त्याच्या कोपऱ्यात चोरीचा हायवा उभा असलेला पोलिसांना दिसला. त्याच वेळी तिथे एक संशयास्पद मारुती डिझायर कार (क्रमांक एमएच २४ व्ही ४११५) आढळून आली. आडगाव पोलीस आणि स्थानिक करमाड पोलीस व नागरिकांच्या मदतीने तिथे सापळा रचण्यात आला. कारमधील दोन इसमांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी लाखलगाव येथून हायवा चोरी केल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेले संशयित आरोपींची नावे विष्णु रामभाउ आकात (वय २९, रा. सातोना, ता. परतुर, जि. जालना) व दिपक शामराव लांडगे (वय २४, रा. पांगडा, ता. घणसांवगी, जि. जालना) अशी आहेत. 

यांनी केली कारवाई

आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, गुन्हे शोध पथकाचे सहायक निरीक्षक सतीश जगदाळे, निखील बोंडे, हवालदार मनोज परदेशी, दादासाहेब वाघ, इमरान शेख, निलेश काटकर, शिवाजी आव्हाड, वैशाली बच्छाव, दिपाली शार्दुल तसेच पोलीस अंमलदार अक्षय गोसावी, रविंद्र लिलके, प्रितम बोराटे, दिपक भुजबळ, कुणाल राऊत, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर आणि मनोज मोरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

ताज्या बातम्या

राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांची पोलीस स्टेशनहून सुटका

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून केंद्र सरकारविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर काँग्रेसचे ठिय्या आंदोलन तब्बल तीन...