पुणे | प्रतिनिधी
शेअर बाजारात जादा परताव्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला असून या टोळीवर थेट ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत धडक कारवाई केली आहे.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, सायबर गुन्हेगारांवर ‘मकोका’लावण्याची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची या वर्षातील ही दुसरी मोठी कारवाई ठरली आहे. विशेष म्हणजे, या आंतरराष्ट्रीय टोळीमध्ये डॉक्टर, सीए आणि इंजिनिअर यांसारख्या उच्चशिक्षित तरुणांचा सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे.
८६ लाखांच्या फसवणुकीतून उघडकीस आले जाळे
पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात एका ज्येष्ठ नागरिकाची बनावट ट्रेडिंग अॅपद्वारे तब्बल ८६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल झाली होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ सखोल तांत्रिक तपास सुरू केला. तपासादरम्यान सायबर पोलिसांनी वेगाने कारवाई करत गुन्हेगारांशी संबंधित खात्यांमधील २८ लाख रुपयांची रक्कम गोठवली आणि न्यायालयाच्या आदेशानुसार ही रक्कम फिर्यादी ज्येष्ठ नागरिकाला सुरक्षितपणे परत मिळवून दिली.
विविध शहरांतून सहा उच्चशिक्षित आरोपींना अटक
या आंतरराष्ट्रीय गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी पुणे, लातूर, अहिल्यानगर, नवी मुंबई आणि हैदराबाद या ठिकाणांवरून सहा जणांना अटक केली आहे. या टोळीतील एकूण ९ आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बीएचएमएस पदवीधारक डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट (सीए) आणि इंजिनिअर यांचा समावेश असून, या उच्चशिक्षित तरुणांनी एकत्र येत संघटितपणे सायबर गुन्हेगारीचे हे नेटवर्क उभे केले होते.
कंबोडिया कनेक्शन आणि क्रिप्टोकरन्सीद्वारे अर्थव्यवस्थेला धोका
पोलीस तपासात या टोळीचे थेट कंबोडिया येथील मुख्य सूत्रधाराशी कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. ही टोळी कंबोडियातील सूत्रधाराच्या संपर्कात राहून भारतातील नागरिकांना जाळ्यात ओढत होती. फसवणुकीतून जमा झालेली रक्कम युएसडीटी सारख्या आभासी चलनात (क्रिप्टोकरन्सी) रुपांतरित करून परदेशात वर्ग केली जात होती. या प्रकारामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला अत्यंत मोठा धोका निर्माण केला जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
या संघटित टोळीवर केवळ सायबर फसवणूकच नाही, तर पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि गुजरात राज्यामध्ये खंडणी, दरोडा, अमली पदार्थांची तस्करी व फसवणुकीचे अनेक गंभीर गुन्हे आधीच दाखलआहेत. या संघटित गुन्हेगारीचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी या प्रकरणात मकोकाची कलमे समाविष्ट करण्याचे आदेश दिले. सध्या सहाय्यक पोलीस आयुक्त रोहिणी बनकर यांच्या नेतृत्वाखालील विशेष पोलीस पथक या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहे.




