नाशिकरोड | प्रतिनिधी
देवळाली गाव येथे भल्या पहाटे आज शुक्रवार दिनांक 26 रोजी जुन्या वादातून एका युवकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली असून या प्रकरणी संशयित आरोपीला उपनगर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे देवळाली गाव व परिसरात खळबळ उडाली असून पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल माळवे (वय ३६, रा. सुवर्ण सोसायटी, खोले मळा) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून शुक्रवारी पहाटे विशाल माळवे याचा खून करण्यात आला. मयत विशाल माळवे आणि त्याचा मित्र अमोल गायकवाड रात्री एकत्र पार्टी करीत असताना दोघांमध्ये जुन्या वादातून वादावादी झाली. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन संशयित अमोल गायकवाड याने धारदार हत्याराने विशाल माळवे याच्यावर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विशालचा मृत्यू झाला.
संपादकीय : २६ जून २०२६ – एवढी हिंमत येते तरी कुठून?
घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. दरम्यान, संशयित अमोल गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी तपोवन परिसरात सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आणि कामगार कॉलनीतील इमारतीच्या टेरेसवर युवकाचा मृतदेह आढळल्याच्या घटना ताज्या असतानाच आणखी एका खुनाच्या घटनेने नाशिककरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान खुनाची घटना घडल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले याबाबत पुढील तपास उपनगर पोलिस करीत आहेत.




