माणसाच्या मनातील संवेदनशीलता, नैतिक मूल्ये आणि कायद्याचा धाक किती टोकाच्या पातळीवर जाऊन संपू शकतो, याचे एक मन विषण्ण करणारे आणि समाजमानाला पोखरून काढणारे वास्तव पुण्यातून समोर आले आहे. लोहगडावर ४०० फूट खोल दरीत ढकलून केतन अग्रवाल या २५ वर्षीय तरुणाचा करण्यात आलेला खून तरुण पिढीतील वाढती हिंस्र प्रवृत्ती, नात्यांमधील संवादाचा अभाव आणि टोकाचा आत्मकेंद्रितपणा दाखवणारा एक सामाजिक आजार आहे. ज्या मुलीशी लग्न ठरले होते, तिनेच कथित प्रियकराच्या मदतीने रचलेला हा क्रूर कट केवळ धक्कादायक नसून, ‘एखाद्या व्यक्तीचा जीव घेण्यासाठी एवढी हिंमत येते कुठून?’ असा गंभीर प्रश्न उभा करणारा आहे. घटनेचे गांभीर्य आणि क्रूरता पाहिल्यास लक्षात येते की, आरोपी मुलगी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी अतिशय थंड डोयाने या हत्येचा कट रचला. लग्न ठरलेल्या केतनसोबत लग्न करण्याची सियाची इच्छा नव्हती. कोणत्याही सुजाण आणि सुशिक्षित समाजात अशावेळी लग्नाला सरळ नकार देणे हा सोपामार्ग उपलब्ध असतो.
आधुनिक काळात विवाह जुळणे आणि ते न पटल्यास तुटणे या गोष्टी नव्या नाहीत. परंतु आपल्या कुटुंबासमोर किंवा समाजासमोर ‘नाही’ म्हणण्याचे साधे धाडस दाखवण्याऐवजी, एका निरपराध तरुणाचा जीव घेण्याचा मार्ग निवडला जाणे, ही मानसिकताच विकृत आहे. केवळ प्रेमसंबंधातील अडथळा दूर करण्यासाठी एका उमद्या तरुणाला थेट मृत्यूच्या दरीत ढकलून देणे क्रौर्याची परिसीमा गाठणारे आहे. लोहगड किल्ल्यावरून पाय घसरून केतनचा अपघात झाल्याचा बनाव सुरुवातीला रचण्यात आला होता. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांच्या सखोल तपासाने आणि सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणाने हा कट उघडकीस आणला. प्रचंड उष्णतेच्या वातावरणात अंगावर हुडी चढवून, कान आणि चेहरा झाकून फिरणार्या चेतन चौधरीच्या संशयास्पद हालचाली पोलिसांच्या नजरेतून सुटू शकल्या नाहीत. विज्ञानाने आणि तंत्रज्ञानाने आज गुन्हेगारांना पकडणे सोपे केले आहे, तरीही ‘आपण कायद्याच्या हातावर तुरी देऊन निसटू शकू’ हा जो अवाजवी आत्मविश्वास आजच्या गुन्हेगारांमध्ये दिसतो, तो कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटींमुळे की सामाजिक संस्कारांच्या अभावामुळे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न हा उपस्थित होतो की, तरुणाईमध्ये कायद्याची भीती पूर्णपणे संपली आहे का? कोणत्याही गुन्ह्याचा परिणाम हा केवळ तात्कालीक नसतो. आज हे दोन्ही मुख्य आरोपी पोलीस कोठडीत आहेत आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य, करिअर आता अंध:कारमय झाले आहे. हा गुन्हा करताना त्यांनी स्वतःच्या भविष्याचा, आपल्या वृद्ध माता-पित्यांच्या अब्रूचा आणि सर्वात मुख्य म्हणजे ज्या केतनचा त्यांनी जीव घेतला, त्याच्या कुटुंबाच्या कधीही न भरून निघणार्या दुःखाचा विचार का केला नाही? क्षणिक स्वार्थ आणि आंधळ्या प्रेमापोटी माणूस इतका विवेकशून्य कसा होऊ शकतो? वाढत्या वयासोबत येणारी परिपक्वता जर अशा विकृत कृत्यांमध्ये बदलत असेल, तर आपल्या शिक्षण पद्धतीवर आणि कौटुंबिक संगोपनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते. आजच्या डिजिटल आणि वेगवान युगात नात्यांमधील प्रगल्भता कमी होताना दिसत आहे. चित्रपट, सोशल मीडिया आणि आभासी जगातील गुन्हेगारी विश्वाचा प्रभाव तरुण मनांवर खोलवर पडत आहे. ‘हवे ते मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाणे’ ही जी वृत्ती आज समाजात फोफावत आहे, त्याचेच हे हिंस्त्र फलित आहे. सियाने आपल्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी केतनला लोहगडावर नेण्याचा हट्ट धरला, हे दाखवते की मनात हत्येचा कट शिजत असतानाही ती चेहर्यावर प्रेमाचा खोटा मुखवटा घालून वावरत होती. हा थंड रक्ताचा क्रूरपणा अधिक भयावह आहे.
या समस्येवर उपाय शोधताना समाजाने आणि पालकांनी अंतर्मुख होण्याची गरज आहे. मुलांना केवळ भौतिक सुविधा देणे म्हणजे संगोपन नव्हे. त्यांना ‘नकार’ पचवण्याची ताकद देणे, नात्यांमध्ये प्रामाणिकपणाचे महत्त्व पटवून देणे आणि कायदेशीर परिणामांची जाणीव करून देणे गरजेचे आहे. जर एखाद्या मुलाला किंवा मुलीला विवाह मान्य नसेल, तर त्यांनी तो आपल्या कुटुंबाकडे स्पष्टपणे मांडला पाहिजे आणि पालकांनीही मुलांच्या मताचा आदर करत त्यांना त्यांचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. नकार देण्याचे भय जेव्हा मनात निर्माण होते, तेव्हाच असे गुप्त आणि हिंस्त्र कट रचले जातात. या घटनेतून धडा घेऊन, भविष्यात एकाही ‘केतन’चा असा दुर्दैवी बळी जाणार नाही आणि कायद्याचा वचक समाजात कायम राहील, यासाठी पोलीस प्रशासनाने या गुन्हेगारांना कठोरतम शिक्षा मिळवून देणे हेच आता योग्य न्यायाचे पाऊल ठरेल.




