नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
येथील जेलरोड परिसरात (Jail Road) मागील भांडणाच्या किरकोळ कारणावरून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दोन तडीपार गुंडांमध्ये वाद झाल्याने या वादाचे पर्यावसण हाणामारीत झाले. त्यानंतर एकाने दुसऱ्यावर धारदार हत्याराने (Sharp Weapon) हल्ला केल्याने या हल्ल्यात एक जण ठार झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान या घटनेमुळे नाशिकरोडच्या गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.
सदरचा प्रकार हा गुरुवार दिनांक एक मे रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास जेलरोड परिसरातील मोरे मळा (More Mala) बालाजीनगर येथे घडला तर संशयित आरोपी हा स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आहे. जेलरोड भागातील मोरे मळा येथे राहणारा संशयित गुन्हेगार नीलेश पेखळे हा गुरुवारी रात्री घराजवळ उभा असताना त्याचाच तडीपार असलेल्या गुन्हेगार मित्र हितेश डोईफोडे व त्याचा मित्र बंटी बंग दोन्ही (रा. सानेगुरुजीनगर, महाजन हॉस्पिटल मागे जेलरोड) येथे मोरे मळा परिसरात आले.
त्यानंतर निलेश आणि हितेश यांचा मागील कारणावरून वाद झाला व दोघेही एकमेकांवर धावून गेले. या दरम्यान नीलेश याने धारदार हत्याराने हितेश याच्यावर हल्ला केला असता हितेश याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जखमी झाला. त्यानंतर त्याच्या डोक्यातून रक्तस्राव होऊ लागला तसेच मित्र बंटी मध्यस्थी करण्यासाठी आला असता नीलेश याने त्याच्यावर देखील हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान निलेश व त्याचे आणखी दोन मित्र त्या ठिकाणी उपस्थित होते. या घटनेत हितेश याला वर्मी घाव लागल्याने निलेश याने त्याच्या चारचाकी वाहनात हितेश याला घेऊन जिल्हा रुग्णालय गाठले.
मात्र या दरम्यान हितेश याचा मृत्यू (Death) झाल्याचे लक्षात येताच निलेश याने तेथून पळ काढला व थेट नाशिकरोड पोलीस ठाणे गाठून स्वतः पोलिसांसमोर हजर झाला व झालेली घटना सांगितली. तर बंटी हा देखील गंभीर जखमी झाल्याने त्यास मनपाच्या बिटको रुग्णालयात त्याच्या नातेवाईकांनी दाखल केले आहे. या घटनेने नाशिकरोड व जेलरोड परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटनेप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी निलेश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी हे करत आहे.