Monday, May 4, 2026
Homeक्राईमAshok Kharat Crime News : अत्याचाराचे आरोप असलेल्या अशोक खरातची बड्या नेत्यांसोबत...

Ashok Kharat Crime News : अत्याचाराचे आरोप असलेल्या अशोक खरातची बड्या नेत्यांसोबत उठबस; फोटो आले समोर

नाशिक | Nashik

एका ३५ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनंतर नाशिक क्राइम ब्रांच युनिट-१ ने स्वत:ला ज्योतिषी म्हणून घेणार्‍या अशोक खरात(Ashok Kharat) उर्फ ‘स्वघोषित कॅप्टन’ला लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात अटक केली आहे. खरात (Ashok Kharat) हा लोकांचे भविष्य सांगत होता. त्याच्याकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी, सेलिब्रिटी आपले भविष्य जाणून घेण्यासाठी येत होते. मात्र, आता त्याला अटक झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime : अत्याचार प्रकरणातील आरोपी ‘स्वघोषित कॅप्टन’ने स्थापन केलेल्या संस्थेवर चाकणकर संचालक; सुषमा अंधारेंचे खळबळजनक आरोप

अशोक खरातने सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे श्री शिवनिका संस्थान या मंदिराची स्थापना केली आहे. या मंदिराच्या विश्वस्त पदावर महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) आहेत. तर नोव्हेंबर २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. या फोटोमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री दीपक केसरकर दिसत आहेत. तर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासोबतही अशोक खरात एका फोटोमध्ये दिसत आहे. याशिवाय अशोक खरातचे आणखी काही बड्या नेत्यांबाबत फोटो असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सोशल मीडिया पोस्ट करून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. अंधारे यांनी पोस्टमध्ये खरातने स्थापन केलेल्या संस्थेवर रूपाली चाकणकर या ‘संचालक’ म्हणून कार्यरत आहेत. इतकेच नव्हे, तर यापूर्वी जेव्हा खरातवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते, तेव्हा चाकणकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून संबंधित संस्थेवर दबाव आणला आणि खरातसाठी माफीनामा लिहून घेतल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. तसेच खरातच्या घरातील लग्नकार्यातही चाकणकर यांनी जातीने हजेरी लावली होती, असेही अंधारे यांनी नमूद केले. त्यामुळे अशा लिंगपिसाट माणसाला मदत करणाऱ्या चाकणकरांना पदावर ठेवावे का? असा सवाल करत अंधारे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. अंधारे यांच्या आरोपांवर चाकणकर काय उत्तर देतात हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.

महिलेने फिर्यादीत काय म्हटलंय?

स्वतःला कॅप्टन म्हणून मिरवणाऱ्या अशोक खरात याच्या विरोधात देण्यात आलेल्या फिर्यादीत महिलेने म्हटले की,”स्वतः कडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्र तंत्र आणि धार्मिक विधीच्या नावाखाली मनात विश्वास संपादन केला. यानंतर त्याने ऑफिसमध्ये बोलावून गुंगीकारक पदार्थ खायला देऊन अत्याचार केला. २०२२ पासून डिसेंबर २०२५ पर्यंत हा प्रकार सुरू होता, असे तिने फिर्यादीत नमूद केले आहे.

पोलिसांना सापडले ५८ व्हिडिओ

कॅप्टन खरात याच्या अटकेनंतर पोलिसांनी (Police) त्याच्या विविध ठिकाणांवर शोध मोहीम राबवली असता तपासात तब्बल ५८ व्हिडिओ सापडले आहेत. या व्हिडीओमध्ये नामांकित महिला तसेच सेलिब्रिटी वरिष्ठ अधिकारी आणि काही राजकीय नेत्यांची माहिती असल्याचे समजते. पोलीस सध्या या जप्त केलेल्या व्हिडिओंची सखोल चौकशी करत असून, यातून अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime : मंत्र्यांचे भविष्य सांगणाऱ्या ‘स्वघोषित कॅप्टन’ला लैंगिक अत्याचाराच्या आरोपात अटक; पोलिसांना सापडले तब्बल ५८ व्हिडीओ

कॅप्टन अशोक खरात कोण आहे?

कॅप्टन खरात हे मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहेत. ‘शिवनिका ट्रस्ट’च्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये २२ वर्षांची कारकीर्द पूर्ण करताना कॅप्टन खरात यांनी १५४ देशांचे दौरे पूर्ण केले आहेत. त्यामुळे, या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नीतिमूल्ये, प्रगती, मागासलेपणा आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला असावा, असे मानले जाते. कॅप्टन खरातने आपले लक्ष ‘कॉस्मॉलॉजी’ (विश्वशास्त्र) नावाच्या विज्ञानशाखेच्या अभ्यासाकडे वळवले, तेव्हापासून त्याच्या आयुष्याला रंजक वळण मिळाल्याचे सांगितले जाते. कॉस्मॉलॉजीने गेल्या १०० वर्षांत प्रचंड प्रगती साधली आहे. कॅप्टन खरात यांनी कॉस्मॉलॉजीचे शिक्षण आपल्या या क्षेत्रातील गुरू, कै. श्री. मुजुमदार साहेब, जे त्यावेळी ‘ऑस्ट्रेलियन मर्चंट शिपिंग विभागा’चे ‘सेलिंग विभाग प्रमुख’ आणि ‘स्वाक्षरी अधिकारी’ होते यांच्या विशेष आग्रहास्तव घेतले. आपल्या प्रशिक्षण काळात एकूण २७७ विद्यार्थ्यांमधून त्यांनी सुवर्णपदक पटकावले. मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झाल्यानंतर, कॅप्टन खरात सध्या ‘शिवनिका ट्रस्ट’चे नेतृत्व करत आहेत. तसेच त्यांनी विश्व शास्त्राच्या क्षेत्रालाच आपली पुढील कारकीर्द म्हणून पुढे चालू ठेवल्याचे बोलले जाते.

ताज्या बातम्या

Crime News : धक्कादायक! चाळीसगावात अशोक खरात सारखे प्रकरण उघड; प्रेमप्रकरणातून...

0
चाळीसगाव | मनोहर कांडेकर | Chalisgaon नाशिकसह संपूर्ण राज्यात भोंदूगिरीकरुन लोकांची फसवणूक करणारा अशोक खरातचे प्रकरण गाजत असताना तीन जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चाळीसगावातही देखील...