नाशिक | प्रतिनिधी |Nashik
सराफ बाजारात व्यवसायासाठी लाखाच्या खंडणीची (Extortion Case) मागणी करीत व्यावसायिकाच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पसार गुन्हेगारास बेड्या ठोकण्यात आल्या. शहर गुन्हेशाखेच्या अंबड शाखेने (Ambad Crime Branch) गंगापूरच्या पाईपलाईन रोडवर कारवाई केली आहे.
विराज उर्फ राज जगदीश जंगम (३०, रा. गुरुपुष्यामृत सोसायटी, बालाजी कोट, दिल्ली दरवाजा) असे संशयिताचे नाव आहे. गेल्या मार्च महिन्यापासून तो पसार होता. या गुन्ह्याचा समांतर तपास शहर गुन्हेशाखेचे अंबड शाखा करीत असताना अंमलदार भगवान जाधव, चारुदत्त निकम यांना संशयित जंगम हा गंगापूर रोड परिसरातील (Gangapur Road Area) पाईपलाईन रोड येथे येणार असल्याची खबर मिळाली होती. पथकाचे प्रभारी उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांच्यासह पथकाने बुधवारी (ता. २६) दुपारी सापळा रचला.
संशयित जंगम आला असता, दबा धरून असलेल्या पथकाने त्यास शिताफीने अटक (Arrested) केली. गेल्या नऊ महिन्यांपासून पसार असलेला जंगम हा या दरम्यान राजस्थान, खाटू शाम, पुणे येथे वास्तव्यास राहिला. त्यास तपासकामी सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गुन्हेशाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके, अंबडचे वरीष्ठ निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या सूचनेने उपनिरीक्षक मोतीलाल पाटील आदींनी कारवाई केली.




