Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमNashik Crime : आंतरजिल्हा गुंडांच्या टोळीला दिली मारण्याची सुपारी; पोलिसांनी अवघ्या एका...

Nashik Crime : आंतरजिल्हा गुंडांच्या टोळीला दिली मारण्याची सुपारी; पोलिसांनी अवघ्या एका तासात ठोकल्या बेड्या

येवला | प्रतिनिधी | Yeola

खूनाची (Murder) सुपारी घेऊन जिवघेणी मारहाण करणाऱ्या आंतरजिल्हा गुंडांच्या टोळीला (Criminal Gang) गावठी कट्टा व कोयत्यांसह अवघ्या एक तासात येवला तालुका पोलिसांनी (Yeola Taluka Police) जेरबंद केले आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संदिप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक हर्षवर्धन बहिर हे करत आहे.

- Advertisement -

रविवार (दि. १२) रोजी दुपारी साडेचार वाजेचे सुमारास सोमठाणदेश (ता. येवला) गावातील ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात फोन करून, गावातील गौरव दत्तु सोनवणे यांस व त्यांच्या कुटुंबियांना शेतीच्या वादातून बाहेरील ८ ते १० गुंडांकडून जबर मारहाण झाली आहे. हे मारहाण करणारे इसम १ सफेद व १ काळया रंगाच्या चारचाकी वाहनाने कोपरगावच्या दिशेने निघाले आहेत, अशी माहिती दिली.

YouTube video player

त्यानंतर पोलीस ठाण्याकडील (Police Station) विशेष पथक तात्काळ रवाना होऊन सोमठाणदेश गावाकडे जात असतांना त्यांना धुळगांव शिवारात पोलीसांना वरील वर्णनाची वाहने भरधाव वेगात येतांना दिसली. यानंतर पोलीसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला परंतु ते न थांबता येवल्याचे दिशेने गेले. यावेळी पोलीसांनी त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून दोन्ही वाहने कोपरगाव रोडवर आसरा लॉन्सच्या समोर अडवून त्यातील ८ इसमांना ताब्यात घेतले. तर दोन इसम पळून गेले.

यातील राजेंद्र सुधाकर जगताप (वय २७) रा. करंजगांव ता. नेवासा जि. अहिल्यानगर, विलास बबन आयनर (वय ३३) रा. अमळनेर ता. नेवासा जि. अहिल्यानगर, प्रमोद कचरू सोनवणे (वय ३०) रा. वाटापुर ता. नेवासा जि. अहिल्यानगर, हरिहर भागीरथ औटे (वय २३) रा. वाटापुर ता. नेवासा जि. अहिल्यानगर, अक्षय अशोक राजळे (वय २३) रा. वळणप्रिंप्री ता. राहुरी जि. अहिल्यानगर, शरद निवृत्ती चोपडे (वय ४१) रा. वाटापुर ता. नेवासा जि. अहिल्यानगर, साहिल मेहताब शेख (वय १९) रा. खेडवे परमानंद ता. नेवासा जि. अहिल्यानगर, प्रदिप माणिक वायकर (वय २६) रा. तामसवाडी ता. नेवासा जि. अहिल्यानगर यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता, जखमी फिर्यादी गौरव दत्तु सोनवणे रा. सोमठाणदेश ता. येवला व प्रमोद कचरू सोनवणे (वय ३०) रा. वाटापुर ता. नेवासा जि. अहिल्यानगर यांच्यात वडीलोपार्जित शेतीवरून वाद झाला. त्यामुळे प्रमोद सोनवणे याने अहिल्यानगर मधील ६ ते ७ गावगुंडांना, गौरव सोनवणे व त्याच्या कुटुंबीयांस जिवे ठार मारण्याची सुपारी दिली असल्याची माहिती मिळाली.

तसेच यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून (Suspected) ३० हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल कटटा, ९०० रुपये किमतीची ३ जिवंत काडतुसे, २०० रुपये किमतीचे २ लोखंडी कोयते, १०० रुपये किमतीचा १ लोखंडी पाईप, २५० रुपये किमतीचे ५ लाकडी फावडयाचे नविन दांडके, १० लाख रुपये किंमतीची १ काळया रंगाची हुंदई वेन्यु चारचाकी (MH 17 CX 8497) गाडी, ५ लाख रुपये किंमतीची १ सफेद रंगाची मारूती सुझुकी स्विप्ट चारचाकी (MH 20 BN 2197) गाडी, ८० हजार रुपये किमतीचे ८ विविध कंपनीची स्मार्ट मोबाईल फोन असा एकूण १६ लाख ११ हजार ४५० रूपयांचा ऐवज जप्त केला. ताब्यातील संशयितांविरुद्ध सोनई पोलीस ठाणे, एमआयडीसी पो. स्टे. नगर, नेवासा पोलीस ठाणे, संगमनेर तालुका पो.स्टे. येथे विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यातील चौघे पंधरा दिवसांपासून जामिनावर मुक्त झालेले आहेत.

दरम्यान, सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) अपर पोलीस अधिक्षक, मालेगाव परिमंडळ तेगबिरसिंग संधु, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संदिप मंडलिक, पोउनि हर्षवर्धन बहिर, पोलीस नाईक पल्हाळ, सचिन वैरागर, पोलीस शिपाई पंकज शिंदे, राजु डुबे, पानसरे, सोनवणे, बनकर यांनी पार पाडली.

ताज्या बातम्या