नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मुंबईतील महिंन्द्रा कंपनीच्या प्लांटमधून नवेकोरे पिकअप (Pickup) वाहन ताब्यात घेऊन त्याची नाशिकमार्गे उत्तर प्रदेशातील इच्छितस्थळी पोहोचवण्यासाठी निघालेल्या चालकाकडे दोन सराईतांनी द्वारका उड्डाणपुलाखाली लिफ्ट मागितली. नंतर त्याला चाकूचा धाक दाखवून पिकअप जबरीने चोरुन (Stolen) नेली. भद्रकाली पोलिसांनी (Bhadrakali Police) तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अवघ्या सहा तासांत दोघा सराईत चोरट्यांना अटक केली.
जगदीश अर्जुन मोरे (वय ३८ वर्षे, रा. दुधखेड, ता. चांदवड) व राहुल भाऊसाहेब मोगल (वय ३५, रा. बसस्टँडजवळ, उगावरोड, ता. निफाड) अशी त्यांची नावे आहेत. पिकअप घेऊन नांदगाव येथील नागापूर शिवारातील मनमाड-नांदगाव मार्गावरुन पळून जात असताना भद्रकाली पोलिसांनी पाठलाग करुन दोघांना ताब्यात घेतले. वाहनचालक अरमान रसीद राईन (वय २६, रा. प्रेमनगर, उरई, जि. जालौन, उत्तरप्रदेश) याच्या फिर्यादीनुसार तो खासगी चालक आहे. गुरुवारी (दि. २६) मुंबईतील कांदिवलीत असलेल्या महिंद्रा कंपनीच्या (Mahindra Company) प्लांटमधून बोलेरो पिकअप ताब्यात घेऊन ती उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथील मोसाराम एंटरप्रायजेस येथे पोहोचण्यासाठी तो निघाला होता.
सायंकाळी साडेसहा वाजता तो नाशिकच्या द्वारका भागातील (Dwarka Area) ट्रॅक्टर हाऊस येथे येऊन थांबला. तेव्हा दोघे अनोळखी व्यक्ती त्याच्याजवळ आले. त्यांनी ‘२०० रूपये भाडे देतो, मालेगाव येथे सोडून द्या’ असे म्हटले. यानंतर राईनने होकार दिला असता, तिघे मालेगावच्या दिशेने निघाले. त्यावेळी जुना आडगाव नाका (Old Aadgaon Naka) येथे संशयितांनी राईनच्या पोटाला चाकू लावून आमच्या सांगण्यानुसारच गाडी चालव, नाहीतर तुला ठार मारू, अशी धमकी दिली. त्यामुळे त्याने घाबरुन जात पिकअप वणी गावापुढे नेली.
त्यानंतर दोघांनी अंधारात व भरपावसात राईनला खाली उतरवून १० लाख १६ हजारांची नवी पिकअप, २५ हजारांचा मोबाईल व हजार रुपये जबरी चोरी करुन नेले. तपासात संशयितांचा (Suspected) ठावठिकाणा लागला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ दोनचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, विक्रम मोहिते यांच्या सूचनेने भद्रकाली गुन्हेशोध पथकाने (Bhadrakali Crime Branch) ही कार्यवाही केली.
असा लागला छडा
ही घटना घडताच, चालक राईन याने वणी पोलीस ठाणे गाठून हकिगत सांगितली. तेव्हा वणी पोलिसांनी ‘झिरो’ नंबरने गुन्हा नोंदवून घटनास्थळ भद्रकाली पोलिसांच्या कार्यक्षेत्रात असल्याने तो वर्ग केला. भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या सूचनेने गुन्हेशोध पथकाचे सहायक निरीक्षक सत्यवान पवार व पथकाने सीसीटीव्ही फूटेड पडताळले. त्यातच अभिलेखांची माहिती पडताळल्यावर संशयित मोरे व मोगल यांची सराईत चोरटे म्हणून ओळख निष्पन्न झाली. मानवी कौशल्य व तांत्रिक विश्लेषण करुन संशयितांचे लाईव्ह लोकेशन ट्रेस केले. तेव्हा संशयित बोलेरो घेऊन नांदगावमार्गे पळून जात असल्याचे समोर आले. यानंतर पथकाने पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले.
ठळक मुद्दे
* दोघांवर दरोडा, जबरी चोरी, चोरी, मारहाणीचे सात गुन्हे.
* सटाणा, वडनेरभैरव, दिंडोरी, वणी पोलिसांत गंभीर गुन्हे नोंद.
* पंचनामा करून वाहन, मोबाईल, रक्कम हस्तगत.
* गुन्हा घडल्यावर सात तासांत संशयित अटकेत.
* हायवेवर चोरी, लूट करण्यात दोघांचा हातखंडा.
* न्यायालयाच्या आदेशाने पिकअप, मोबाईल परत करणार