नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सध्या शहरासह जिल्ह्यात (District) सर्वत्र विविधांगी गुन्हेगारांचा पोलिसांकडून (Police) दिवाळी ‘पाडवा’ साजरा केला जात असून त्यांच्याकडून ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ या घोषणेचा ‘जोर’ वदवून घेतला जात आहे. असे असतानाच, दिले जाणारे ‘फराळ’ नुकतेच एका पोलीसपुत्रालाही (Police Son) करिअरच्या वैभवासाठी ‘लाभदायी’ ठरले आहे.
मद्य पिऊन रात्री बेरात्री ‘पोलीस’बापाच्या अपरोक्ष ‘उडाणटप्पू’पणा करणाऱ्या या पुत्रास म्हसरुळ पोलिसांनी (Mhasrul Police) दिवाळीच्या दिवशीच ‘भरपेट’ फराळ खाऊ घालत धुंदी उतरविली. याबाबत म्हसरुळ पोलिसांत त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ क प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वैभव अरुण पाटील (वय २८, रा. पोलीस मुख्यालय, गंगापूर रोड, नाशिक) असे संशयित (Suspect) पोलीसपुत्राचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २१) लक्ष्मीपूजनासह दिवाळी साजरी झाली असतानाच, म्हसरुळ पोलिसांचे पथक बोरगडसह एकता नगर परिसरात रात्रगस्त करीत होते. त्याचवेळी मध्यरात्री दोन वाजता संशयित वैभव हा एकतानगरातील रिद्धीसिद्धी अपार्टमेंटजवळ मद्य पिलेल्या अवस्थेत व स्वतःचे अस्तित्व लपवून चोरी किंवा घरफोडीच्या उद्देशाने लपून बसल्याचे आढळले. पोलिसांनी त्याला हटकून विचारणा केली असता, त्याने नाव सांगून परिसरात थांबण्याचा ‘उद्देश’ स्पष्ट केला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत म्हसरुळ पोलीस ठाण्यात आणले. भल्या पहाटे त्याचा यथोचित ‘सत्कार’ करुन गुन्हा दाखल करण्यात आला.
नाशिक पोलिसांच्या ‘स्पेशल पॅटर्न’ नुसार पोलीसपुत्राच्या ‘वैभवा’ला विशेष फराळ देण्यात आले. या कारवाईमुळे नाशिक पोलिसांप्रती नाशिककरांनी अधिक समाधान व्यक्त केले आहे. इतर गुन्ह्यातील संशयितांप्रमाणेच पोलीसपुत्राचाही ‘सन्मान’ झाला असून लवकरच शहर पोलीस मुख्यालयाच्या विविध ‘चाळी’तील काही सराईतांसह उपद्रवी पोलीसपुत्रांना ‘सचबोल’चे धडे दिले जाणार आहे, असे कळते.
पुन्हा नवीन यादी!
सप्टेंबर महिन्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून गुन्हे शाखा युनिट एकच्या कार्यालयात पोलीस आयुक्तांसह गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ठाण मांडले. लोंढे व बागूल टोळीला बेड्या ठोकण्यासह सर्वपक्षीय संशयितांना बोलावून घेत ‘सच बोल’चे धडे देण्यात आले. अनेकांनी ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ म्हणत पोलिसांसमोर हात जोडले. हीच धास्ती घेत बरेच संशयित अद्यापही राज्याबाहेर लपले आहेत. मात्र, आता पोलिसांनी नव्या यादीसह दिवाळीनंतरच्या फटाकेबाजीसाठी ‘जोरदार’ तयारी केल्याचे समजते.




