नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरात फोफावलेली अवैध सावकारी (illegal Money Lenders) आणि नागरिकांचा छळ रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने (Police Commissionerate) कठोर भूमिका घेत शनिवारी दिवसभर चौदा ठिकाणी छापेमारी केली. आठ संशयितांविरुद्ध (Suspected) सबळ पुराव्यांसह आठ गुन्हे नोंद करून त्यांच्या अटकेची तयारी केली आहे. यात माजी नगरसेवकांसह विद्यमान आमदारांच्या आप्तेष्टाचा समावेश उघड झाला आहे. त्यामुळे अवैध सावकारीत पांढरपेशी संशयितांसह राजकारणी, काही सराईत गुन्हेगारांचा समावेश उघड झाला आहे.
शहर पोलिसांनी (City Police) पहिल्यांदाच अवैध सावकारीविरुद्ध केलेल्या या धडक कारवाईचे नाशिककरांनी स्वागत केले आहे. माजी नगरसेवक नैय्या खैरेंसह राजेंद्र जाधव, कैलास मैंद, धनू लोखंडे, गोकुळ धाडा, सुनील पिंपळे, प्रकाश अहिरे व संजय शिंदे या संशयितांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम सन २०१४ अन्वये संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तर संशयित गुरुदेव कांदे, कैलास मुदलियार, नीलेश आल्हाट, सचिन व किरण मोरे, जुबेर पठाण, रोहित चांडोळे यांच्या घरझडतीत आर्थिक व्यवहाराचे संशयास्पद चेक, कागदपत्रे आढळले नाही.
शनिवारी (दि.५) गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या पथकांनी भल्या सकाळी शहरातल्या तेरा ते चौदा खासगी व अवैध सावकारांच्या घरांसह संशयास्पद ठिकाणी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या सावकारी नियंत्रण पथकांच्या मदतीने छापे टाकले. या कारवाईत वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे, अंचल मुदगल, विद्यासागर श्रीमनवार, जग्वेंद्रसिंग राजपूत, अशोक गिरी, सुनिल पवार, जितेंद्र सपकाळे, रणजित नलावडे यांच्यासह पथकांनी संशयितांच्या घरांची (House) झडती घेत रोख रक्कम, धनाकर्ष, विदेशी चलन जप्त केले.
जाच सहन करणार नाही : कर्णिक
संशयित वैभव देवरे, भाजप पदाधिकारी रोहित कुंडलवाल यांच्या प्रकरणानंतर नागरिकांनी पोलिसांसमोर अनेक अवैध सावकारांच्या जाचासंदर्भात तक्रारी केल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कठोर भूमिका घेतली आहे. कोणत्याही अवैध सावकाराचा जाच शहरात सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट आदेश कर्णिक यांनी सर्व पोलीस ठाण्यांसह पथकांना दिले आहेत. तसेच ज्यांना सावकारीचा जाच असह्य होत आहे, त्यांनी पोलीस आयुक्तालयात तक्रार करण्याचे आवाहन आयुक्तालयाने केले आहे.
धाडसत्रात गुन्हे नोंद केलेल्या संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. अवैध सावकारीविरुद्ध धडक कारवाई सुरू ठेवणार आहोत. नागरिकांनी स्वतःहून संशयितांविरुद्ध लेखी तक्रारी कराव्यात. तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा, नाशिक
कारवाईत कागदपत्रे, घबाड जप्त
■ नैय्या खैरे १२ करारनामे, १९ धनादेश, २१.५ लाख रोख
■ संजय शिंदे ८१ कोरे धनादेश, ४० खरेदीखत, ६ लेजर बुक, बुक, ४ डायऱ्या, ३ लाख २० हजार ५०० रोख, पैसे मोजण्याचे मशीन
■ प्रकाश अहिरे २३ रजिस्टर कागदपत्रे, साडेचार लाख रोख, ८८ अमेरिकन डॉलर्स (भारतीय मूल्य साडेसात लाख रुपये)
■ सुनील पिंपळे २ घरे, ३ दुकानांची झडती. ११ खरेदीखते, २ साठेखत, १ कब्जा पावती, ५ कोरे स्टॅम्प पेपर, २४ कोरे धनादेश, २ हातउसन पावत्या, ४ लाख ८ हजार रोख
■ गोकुळ धाडा ५० उसनवार पावत्या, २ खरेदी खत, ७० कोरे धनादेश
■ धनू लोखंडे – ५० खरेदी खत, १२ कोरे धनादेश
■ राजेंद्र जाधव २ डायऱ्या, २ लाख ३ हजार साडेतीनशे रुपये रोख
■ कैलास मैंद २ कोरे धनादेश, १ करारनामा, ९ खरेदीखत
दृष्टिक्षेपातून
■ संशयित नैय्या खैरे माजी नगरसेवक व काँग्रेस पदाधिकारी
■ संशयित कैलास मैंद हा विद्यमान आमदारांचा निकटवर्तीय
■ एका माजी नगरसेवकाच्या घराची झडती; संशयास्पद आढळले नाही