नाशिक | प्रतिनिधी | Nashik
विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) कायदा व सुव्यवस्थेस कुठलाही धक्का पोहोचू नये, यासाठी तडीपार करुनही शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Group) प्रचार सभेत वावरल्याप्रकरणी विक्रम नागरे व पवन पवार यांच्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. गुरुवारी (दि. १४) तडीपारीची नोटीस बजावूनही स्वतःच्या पक्ष प्रवेशासाठी शुक्रवारी (दि. १५) सायंकाळी नागरे व पवार हे दोघेही उद्धव ठाकरे यांच्या सभेत पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्धही गुन्हा नोंदवून त्यांना शहराबाहेर धाडले आहे. शहरात अवैध धंदे चालविणारे व शरीर व मालाविरुद्धच्या गुन्ह्यातील संशयितांवर विधानसभा मतदान व मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तडीपार करण्यात आले आहे.
तडीपार केलेल्या या ७३७ संशयितांमध्ये राजकीय पदाधिका व नेत्यांचा समावेश आहे. त्यानुसार भाजप, शिवसेना ठाकरे व शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार व शरद पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांविरुद्ध तडीपारीचे आदेश जारी आहेत. त्यामध्ये भाजप कामगार आघाडीचा पदाधिकारी व्यंकटेश नाना मोरे, शिवसेना ठाकरे गटाचे पचन मटाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) राजेंद्र उर्फ कन्नू काशिनाथ ताजणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कैलास सुरेश मुदलियार यांचा समावेश आहे. या सर्वांना १४ व १५ नोव्हेंबर रोजी नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. तेव्हापासून तर २४ नोव्हेंबरपर्यंत सर्वांना शहराचाहेरच राहण्याचे आदेश आहेत.
दरम्यान, विक्रम नागरे हे यापूर्वी भाजप (BJP) कामगार आघाडीचे पदाधिकारी होते. तर पवन चंद्रकांत पवार हे वंचितचे जिल्हाध्यक्ष होते. या दोघांनीही शुक्रवारी (दि. १५) सायंकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेत पक्ष प्रवेश केला. त्यामुळे तडीपार असतानाही शहरात विनापरवानगी वास्तव्य करून प्रचार सभेत सहभाग घेतला. परिणामी, तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन झाले. त्याक्कन पोलिसांनी दोघांविरुद्ध कायदेशीर कारवाई करुन ताकीद देत तातडीने शहराबाहेर जाण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर दोघे शहराबाहेर गेल्याची नोंद यंत्रणेने पोलीस दारी केली आहे.
इतरांवरही कारवाई
शहरातील १३ पोलीस ठाणे व चुंचाळे पोलीस चौकी अंतर्गत आचारसंहिता लागू झाल्यापासून प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. अवैध धंदे चालविणाऱ्या ३८९ जणांसह खून, खुनाचे प्रयत्न, प्राणघातक हल्ल्यांचे गुन्हे असलेल्या ३४९ संशयितांना २४ नोव्हेंबरपर्यंत हद्दपार केले आहे. या ७३७ संशयितांना बुधवारी (दि. २०) सकाळी ७ ते दुपारी २ यावेळेत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मात्र, त्यानंतर पुन्हा शहराबाहेर जावे लागेल. त्यामुळे या सर्व हद्दपारांवर नजर ठेवण्यासाठी पथके तैनात आहेत. विनापरवानगी शहरात वावरणाऱ्याऱ्यांविरुद्ध तडिपारी आदेशाचे उल्लंघन केल्याचे गुन्हे नोंदविले जाणार आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा