नाशिक | प्रतिनिधी | Nashik
काही दिवसांपूर्वी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात (Nashik Road Central Jail) बंदिस्थ कैद्यांचा गांजा पित असल्याचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता. यामध्ये काही फोटोंचा देखील समावेश होता. त्यामुळे कारागृहातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर आता नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात एका बंदिस्थ कैद्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवदास मुघल भालेराव (वय ५८) असे आत्महत्या (Suicide) केलेल्या न्यायाधिन बंदी कैद्याचे नाव आहे. त्याने रविवार (दि.२६) रोजी दुपारच्या सुमारास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच कारागृहातील पोलीस (Police) अंमलदारांनी भालेराव यास खाली उतरवून शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले.
दरम्यान, भालेराव हा सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) रहिवासी होता.त्यास एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. यानंतर या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावण्यात आली होती. जून २०२४ पासून तो नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. या घटनेप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.




