नाशिक | प्रतिनिधी | Nashik
काठे गल्ली परिसरातून (Kathe Galli) व्यावसायिकाचे अपहरण (Kidnapping) करीत त्याच्याकडून १५ लाख रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी अटक (Arrested) केलेल्या टिप्पर गँगचा सराईत प्रणव तुकाराम बोरसे उर्फ मोहमंद अमीन तुकाराम बोरसे याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने तीन दिवसांची वाढ केली आहे. प्रणवला रविवारी (दि.१८) अटक केली आहे. त्यास न्यायालयात मंगळवारी (दि. २०) हजर केले असता न्यायालयाने (Court) शुक्रवारपर्यंत (दि.२३) पोलीस कोठडी सुनावली.
४ एप्रिलला व्यावसायिक निखील दर्यानानी यांचे काठे गल्ली परिसरातून तिघांनी अपहरण केले होते. अपहरणकर्त्यांनी निखील यांना धमकावत त्यांच्या भावाकडून (Brother) १५ लाख रुपयांची खंडणी घेतली होती. निखील यांनी अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करवून घेत पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत या प्रकरणी सुरुवातीस चौघांना अटक केली. अपहरण करीत खंडणी मागण्याचा कट टिप्पर गँगचा म्होरक्या शाकीर पठाण उर्फ मोठा पठाण याने रचल्याचे उघड झाले.
पखाल रोड येथील सातपीर बाबा दर्गाचे अतिक्रमण काढण्यास विरोध म्हणून दंगल करण्यासाठी तसेच पोलिसांनी (Police) दंगलीतील गुन्हेगारांना अटक केल्यानंतर त्यांच्या जामीनासाठी व्यावसायिकाचे अपहरण करीत खंडणी मागितल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. सखोल तपासात शाकीर पठाण याच्यासह प्रणव बोरसेनेही कटात सहभाग घेतल्याचे पोलिसांना समजले. त्यामुळे पोलिसांनी तपास करीत प्रणवला अटक केली.
दरम्यान, न्यायालयाने सुरुवातीस त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी सखोल तपासासाठी पोलीस कोठडीची (Police Custody) मुदत वाढवण्याची मागणी केली. त्यात प्रणवच्या घराची झडती घेणे, त्याच्या बँकखात्याची चौकशी करणे आणि इतर माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी पुन्हा पोलीस कोठडीची मागणी केली.
गुन्ह्यांची जंत्री
प्रणवविरोधात खुनाचे दोन, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, खंडणी, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, अपहरण करुन पैशांची मागणी अशा गंभीर कलमांनुसार २८ गुन्हे दाखल आहेत. त्यातील २२ गुन्हे अंबड पोलीस ठाण्यात दाखल असून भद्रकाली, मालेगाव तालुका, इंदिरानगर, गंगापूर, मुंबईनाका आणि आहवा या पोलीस ठाण्यांत प्रत्येकी १-१ गुन्हा आहे.