नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नव्याने सुरू केलेल्या अपार्टमेंटच्या बांधकामासाठी व्याजाने घेतलेल्या १५ लाख रुपयांच्या बदल्यात अवैध सावकारांनी (Illegal Money Lending) बिल्डरकडून २५ लाख २८ हजार रुपये उकळले. यानंतर, बांधकाम व्यावसायिकाला ठार मारण्याची धमकी देत जबरदस्तीने चार फ्लॅट बळकावून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
इंदिरानगर पोलिसात (Indiranagar Police) संशयित चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांत एका वकिलाचाही सहभाग समोर आला आहे. रोहित विग, सचिन विग (दोघे रा. शांती निवास, पपया नर्सरीजवळ, सातपूर), अॅड. नाना लांबे (रा. नाशिक), रवी शर्मा अशी संशयितांची नावे आहेत. वरुण सुरेश शहानी (३५, रा. श्रीराम प्राईड, अशोकामार्ग, नाशिक-पुणे रोड) यांच्या फिर्यादीनुसार, २०२१ मध्ये त्यांनी राजीवनगर येथे समृद्धी अपार्टमेंट या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू केले.व्यवसायात आर्थिक चणचण भासल्याने त्यांनी संशयित (Suspect) रोहित विग याच्याकडून १० टक्के व्याजाने १५ लाख रुपये घेतले.
संशयित विग यांनी शहानी यांच्याकडून आत्तापर्यंत व्याजासह २५ लाख २८ हजार ८०० रुपये वसूलही केले. तरीही संशयित विग याने शहानी यांच्या समृद्धी अपार्टमेंटमधील फ्लॅट नं. १०४ व १०५ हे दोन फ्लॅट जबरदस्तीने लिहून घेतले. त्यानवरच न थांबता पुन्हा आधी नावावर केलेल्या दोन फ्लॅट ऐवजी २०१, ४०१, ४०२, ४०३ हे चार फ्लॅट शहानी यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत रोहित विग, सचिन विग, बिंदू विग, नाना लांबे यांच्या नावावर लिहून घेतले. तसेच शहानी यांना मारहाण करीत जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण करीत उपनिबंधक कार्यालयात घेऊन नेत जबरीने दस्त नोंदवून घेतले. संशयितांनी संगनमताने बिल्डर शहानी व त्यांच्या भावाची आर्थिक फसवणूक (Fraud) केली. इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल आहे.





