नाशिक |प्रतिनिधी | Nashik
अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचे अधिकारी असल्याचे भासवत तिघांनी दोन ट्रकचालकांकडील रोकड, मोबाइल, वाहनांची कागदपत्रे व चाव्या हिसकावून नेल्याची घटना सातपूर (Satpur) येथील उद्योग भवन परिसरात घडली होती. याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून सातपूर पोलिसांनी तिघांना अटक केली. दरम्यान, या गुन्ह्यासंदर्भात सातपूर पोलिसांनी एफडीएतील दोघा अधिकाऱ्यांची चौकशी केली. तिघा संशयितांचा विभागासोबत तसेच या अधिकाऱ्यांसोबत काय संबंध होता ? याबाबत चौकशी केल्याचे समजते.
येवला टोलनाका (Yeola Tollbooth) येथे रविवारी (दि.११) मध्यरात्री तिघांनी एफडीए अधिकारी (FDA Officers) असल्याचे भासवत दोन ट्रकचालकांना अडवून त्यांच्याकडील मोबाइल, रोकड, वाहनांच्या चाव्या हिसकावून नेल्याची घटना घडली होती. चोरट्यांनी ट्रकचालकांना उद्योग भवन येथे ट्रक लावण्यास सांगत पसार झालेले. त्यामुळे कारवाईच्या प्रतिक्षेत दोन्ही ट्रकचालक व वाहक तीन दिवस उद्योग भवनच्या आवारातच बसून होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपास करीत चारुदत्त त्र्यंबक भिंगारकर (३७, रा. अशोका मार्ग), मयुर अशोक दिवटे (३२, रा. बुधवार पेठ, जुने नाशिक) व नविन अशोक सोनवणे यांना पकडले.पकडलेले तिघे संशयित अन्न व औषध विभागाचे खबरी असल्याचे सुत्रांनी सांगितले.
त्यादृष्टीने सातपूर पोलिसांनी (Satpur Police) एफडीएतील (FDA) दोघांची बुधवारी (दि.२१) चौकशी केल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यात पकडलेल्या तिघा संशयितांसोबत कशी ओळख झाली, त्यांचा विभागात वावर होता का? १० मे रोजी केलेल्या कारवाईत तिघांची भूमीका काय होती ?, ११ मे रोजी केलेल्या चोरी संदर्भात दोघांना माहिती होती का असे प्रश्न पोलिसांनी विचारल्याचे समजते. त्यावर १० मे रोजी एफडीएने केलेल्या कारवाईच्या वेळी तिघे संशयित घटनास्थळी हजर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र ११ मे रोजी तिघांनी केलेल्या जबरी चोरीबाबत काहीच माहिती नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे समजते.