नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशकात (Nashik) एमडी ड्रग्जचे (MD Drugs) स्वतंत्र नेटवर्क चालविणाऱ्या तीन तरुणींसह एका पुरुषाला मॅफेड्रॉनसह (एमडी) नाशिक अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) अटक केल्यानंतर आता मुंबईतून नाशिकमध्ये ‘एमडी’ आणणाऱ्या दोन तस्करांना ताब्यात घेण्यात आले आहे. सोमवारी (दि. १३) दोन संशयितांकडून सुमारे सत्तर ग्रॅम ‘एमडी’ नाशिक ‘एनडीपीएस’ने जप्त (Seized) केल्याचे समजते. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचनामा, संशयितांच्या चौकशीसह गुन्हा नोंदविणे सुरू होते.
‘एनडीपीएस’च्या वरिष्ठ निरीक्षक सुशिला कोल्हे यांना मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (दि. १३) शहरात पुन्हा सापळा रचण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार, पथकाने सापळा रचून दोन संशयितांना (Suspects) सायंकाळी उशिराने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे सत्तर ग्रॅम ‘एमडी’ जप्त केल्याचे समजते. या दोन संशयितांनी मुंबईतून नाशिकमध्ये ‘एमडी’ आणत विक्रीचा प्रयत्न केला. गत काही महिन्यांपासून या संशयितांवर पथकाची पाळत होती. त्यामुळे मुंबईमार्गे नाशिकमध्ये ‘एमडी’ तस्करी सुरू असल्याचे उघड होत आहे.
नाशिकमध्ये (Nashik) मॅफेड्रॉन (एमडी) तस्करीच्या गुन्ह्यात ‘छोटी भाभी’, हिना शेख, ड्रग्जमाफिया ललित पानपाटीलची मैत्रिण प्रज्ञा व अर्चना यांपाठोपाठ तीन महिलांचा सहभाग उघड झाला आहे. ‘एनडीपीएस’ने मुंबई नाका परिसरातील खासगी ट्रॅव्हल्स थांब्याजवळ आणि हॉटेल सरोजमध्ये छापा टाकला. तिथे गणेश कैलास गिते (वय ४५, रा. मखलमलाबाद) याला अटक केली. त्यानंतर हॉटेल सरोजमध्ये मुक्कामी असलेल्या रूतुजा भास्कर झिंगाडे (वय २२, रा. शिवाजी पार्क, सातपूर), स्विटी सचिन अहिरे (वय २८, रा. श्रीधर कॉलनी, पेठरोड) यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, त्यानंतर राहत्या घरातून पल्लवी निकुंभ उर्फ सोनाली शिंदे (वय ३६, रा. साईनगर, अमृतधाम) हिला ताब्यात घेतले. त्यापैकी पल्लवी ही या गुन्ह्यातील ‘मास्टरमाइंड’ असल्याचे समोर आले आहे. तर, सातपूरची ऋतुजा झिंगाडे या एमडीची लत लागल्याने तिने हातांवर इंजेक्शन टाेचून हे डाेस पचविल्याचे समाेर येते आहे.