नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरात अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांचा (Bangladeshi Citizen) मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पांडवलेणी परिसरातील कवठेकरवाडी भागात अवैध वसाहत उभारून राहणाऱ्या सहा बांगलादेशी महिलांना इंदिरानगर पोलिसांनी (Indiranagar Police) शुक्रवारी (दि. २६) ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, परकीय नागरिक कायदा, पासपोर्ट कायदा तसेच भारतीय न्याय संहितेतील तरतुदींनुसार तपास सुरु झाला आहे. ताब्यात घेतलेल्या महिलांकडे कोणतेही वैध पासपोर्ट, व्हिसा किंवा भारतात वास्तव्य करण्याची अधिकृत परवानगी आढळली नसून त्यांनी बेकायदेशीररीत्या सीमा ओलांडून किंवा ‘डंकी रुटने भारतात प्रवेश केला आणि नंतर कोलकाता, सूरत, मुंबई व्हाया नाशिकमध्ये (Nashik) स्थायिक झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या महिलांचा नाशिकमध्ये नेमका उद्देश काय होता, याचा तपास सुरु झाला असून प्राथमिक चौकशीत काही महिला ब्युटीपार्लर, हॉटेलसह अवैध उद्योगांमध्ये काम करत असल्याचे उघड झाले आहे.
त्यांना नाशिकमध्ये लकी उर्फ लियाकत हमीद कुरेशी व बॉबी या एजंटांनी आसरा दिल्याचे समोर येत असून त्यांच्या तात्पुरच्या निवासाची व्यवस्था कोणी केली आणि त्यामागे कोणत्या एजंटांची साखळी कार्यरत आहे, याची पडताळणी केली जात आहे. पोलिसांनी परकीय नागरिक नोंदणी कार्यालय (एफपीआरओ) तसेच केंद्र सरकारच्या संबंधित यंत्रणांशी पत्रव्यवहार सुरू केला, तपास पूर्ण झाल्यानंतर डिपोर्टेशन (देशाबाहेर पाठवणे) प्रक्रियेबाबत निर्णय घेतला जाणार आहे. नाशिकमध्ये यापूर्वी दाखल तीन गुन्ह्यांत (Case) बारा अवैध बांगलादेशी महिला आढळून आल्या होत्या. अशा प्रकारच्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ताब्यातील महिलांची नावे
शिल्पी मोहम्मद शुकरअली अकथेर उर्फ शिल्पी अकथेर (वय २५, रा. हबीगंज, चुनारगड, ढाका,) सौम्या संतोष नायक उर्फ सुलताना शब्बीर शेख (वय २८, रा. जोशुर, शेकाटी, बांगलादेश), मुनीया खातून टुकू शेख (वय-२९, रा. पेरोली, खुलना, जि. नोडाईल कालिया-बांगलादेश), सोन्या कबीरुल मंडल उर्फ सानिया रौफिक शेख (वय २७, रा. रा. जोशोर, कोतली, बांगलादेश), मुक्ता जोलील शेख (वय ३५, पैरोली, जांबरेली, बांगलादेश), श्यामोली बेगम उर्फ श्यामोली सामसू खान (वय ३५, रा. जादूपुर, जिल्हा जोशूर खडोलिया, ढाका, बांगलादेश)
मुद्दे
- तपासासह ‘डिपोर्ट’ प्रक्रियेचे प्रयत्न सुरु
- मागील काही प्रकरणांत डिपोर्टेशन, तर काही न्यायप्रविष्ट
- उपनिरीक्षक संतोष फुंदे यांना मिळाली गोपनीय माहिती
- महिलांकडील मोबाईलमध्ये बांगला नागरिकत्वाचे आयडी
- भारतातील बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड जप्त
- सहा महिलांसह एजंट असे सात जण अटकेत




