नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृह (Nashik Road Central Jail) अर्थात छळ छावणीत नुकत्याच उघड झालेल्या अमानवीय गैरकृत्याचा नाशिकरोड पोलिसांनी (Nashik Road Police) तपास सुरु केला नसल्याचे समोर येते आहे. नऊपैकी कोणत्याही कैद्याची (Prisoner) चौकशी झाली नसल्याचे समजत असून आतमध्ये बीडपेक्षा जास्त गुंडगिरी सुरु असल्याचे या गुन्ह्यातून दिसून आले आहे. विशेष म्हणजे या सराईत गुंडांनी विविध सर्कलमध्ये आपापली दहशत वाटून घेतली असून, जे तुरुंगांतून अनुभव घेऊन बाहेर आले, ते संशयित या छळछावणीचे नावही ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत, असे त्यांच्या बोलण्यातून जाणवते.
सागर उर्फ पंकज बाजीराव चौधरी (वय २५, रा. नेर कुसुंबा, जि. धुळे) या पीडित कैद्याच्या फिर्यादीनुसार, मागील १५ दिवसांपूर्वी संशयित कैदी पॉल व त्याचे साथीदार वाघमारे (वॉचमन), दिनेश चव्हाण (बॉचमन), लाला (जबाबदार), मामा (कैदी), वाजिद, महाजन, अमोल आणि मोहन (कैदी) यांनी अतोनात छळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. न्यायालयीन सुनावणीदरम्यान पीडित कैद्याने न्यायाधीशांसमोर (judge) आतमधील अनन्वित छळाबाबत आपबिती कथन केली असता, न्यायालयाने गंभीर दखल घेत पीडित कैद्यास मालेगाव छावणी पोलिसांत फिर्याद दाखल करण्यास सांगितले. तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान, हा गंभीर प्रकार समोर आला असतानाही संशयित कैद्यांवर अजूनही कारवाई झाली नसल्याची माहिती समजते.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शरीर आणि मालमत्ता विषयक गुन्ह्यांत (Case) अनेक सराईत जेरबंद आहेत. या सराईतांनी आजूबाजूच्या सर्कलमधील काही कैद्यांना दहशत माजवून व संघटीत टोळीच्या जोरावर मित्र बनविले आहे. तर, अनेकांना वैयक्तिक टार्गेट करुन त्यांच्याकडून बेकायदेशिरपणे कष्टाची कामे करवून घेतली जात आहे, असा आरोप केला जात आहे. कारागृहात अधीक्षक, तुरुंगरक्षक व अन्य शेकडो जणांचा स्टाफ कार्यरत असताना विविध सर्कलमध्ये दोन दिवसांआड काही ना काही वाद व कुरापती उफाळून येत आहेत. त्यात, ज्याच्यावर प्रसंग ओढावले आहेत ते कारागृहापासून १०० फूट लांबच राहिलेले ‘बरे’ असे बोलत आहेत. दरम्यान, घडलेले चौधरी प्रकरण कारागृहातील विविध सर्कल व बॅरकमध्ये वेगवेगळ्या व नवीन आलेल्या संशयितांच्या बाबतीत जास्तच घडत असल्याचा दावा तुरुंगातून बाहेर आलेल्या काही संशयितांनी (Suspect) केला आहे.
संगनमताने डोळेझाक?
कारागृहात काही संशयित गुन्हेगारी विचारसरणीचे असून त्यांनी आपले काही खास मित्र पंटर बनविले आहेत. त्यात काही शिरजोर कैद्यांचे एकमेकांशी पटत नसल्याने त्यांचेही वाद उफाळून येतात. विशेष म्हणजे याआधी अनेकदा काही कैद्यांनी तुरुंग अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केल्याचे प्रकारही जगजाहीर आहेत. असे असताना सामान्य कैद्याच्या जीवाचे बरेवाईट झाल्यास आरोप-प्रत्यारोप आणि सारवासारव केल्याव्यतिरिक्त काय होणार हा गहण प्रश्न उभा राहिला आहे. तुरुंगात सीसीटीव्ही कॅमेरे असूनही छळ व मारहाणीचे असे गंभीर प्रकार उघड होत नसल्याने सर्वच यंत्रणा संगनमताने डोळेझाक करत आहे का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.
चौकशी होणार?
कारागृहात आतापर्यंत कैद्यांचे आपापसांत हुई, तुरुंगाच्या स्टाफवर प्राणघातक हल्ले झाले आहेत. अनेकांकडे मोबाईल, कटर, अंमली पदार्थ, घातक हत्यारे आढळून आली आहेत. त्यातच कारागृहाल पाठविलेल्या मनीऑर्डरचा कुणीतरी अपहार केल्याचे सागरने फिर्यादीत नमूद केले आहे. त्यामुळे हे प्रकार व सागर चौधरीच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे कारागृह महानिरीक्षक व उपमहानिरीक्षकांनी चौकशी समिती गठीत करून कारवाई केलीच तर कारागृहाला लागलेला छळछावणीचा डाग मिटण्यास मदत होऊ शकते.