नाशिक | प्रतिनिधी | Nashik
एप्रिल महिन्यात काठे गल्ली (Kathe Galli) सिग्नल येथून व्यावसायिकाचे कट रचून अपहरण (Kidnapping) केल्यावर त्याच्या भावांकरवी १५ लाखांची खंडणी उकळल्याच्या गुन्ह्यात सराईत गुन्हेगार प्रणव बोरसे उर्फ मोहमंद आमिन तुकाराम बोरसे याचा सहभाग उघड झाला आहे. टिप्पर गँगचा सूत्रधार शाकीर पठाण याने रचलेल्या या कटात प्रणवचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने शहर गुन्हेशाखेने त्यास अटक (Arrested) केली असून, न्यायालयाने त्यास मंगळवार (दि.२०) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
काठेंगल्ली सिमल येथे ४ एप्रिलला दुपारी सव्वातीनच्या सुमारास व्यावसायिक निखिल दर्यानानी याचे तिघा संशयितांनी अपहरण केले होते. याप्रकरणी संशयितांनी (Suspected) दर्यानानी याच्याकडे एक कोटीची खंडणीची (Extortion) मागणी करीत १५ लाखांची खंडणी उकळली होती. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत चौघांना अटक केली आहे तर या कटाचा मुख्य सूत्रधार व टिप्पर गँगचा म्होरक्या शाकीर पठाण अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मात्र, या कटात सामील असलेला व सराईत गुन्हेगार प्रणव याला पोलिसांनी अटक केली.
दरम्यान, याप्रकरणात मुंबई नाका पोलिसात (Mumbai Naka Police) अपहरणासह खंडणीचा गुन्हा दाखल असून, यात संशयित मोहम्मद अन्वर सय्यद (३०, रा. प्रज्ञानगर, नानावली), सादिक लतीफ सय्यद (३९, रा. लेखानगर), अल्फरान अस्पाक शेख (२५, रा. चौक मंडई, भद्रकाली), अहमद रहिम शेख (२५, रा. वडाळागाव) या चौघांना अटक करण्यात आली आहे. तर मुख्य सूत्रधार शाकीर पठाण पसार झाला आहे. गुन्ह्याचा समांतर तपास शहर गुन्हेशाख करीत आहे.
पोलीस कोठडी
निखिल दर्यानानी यांच्या अपहरण व खंडणीच्या गुन्ह्यामध्ये कट कारस्थानात प्रणय बोरसे याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे तसेच, त्याच्याकडील कारचा बापर या गुन्ह्यात करण्यात आलेला असल्याने ही कार जप्त करण्यासह अपहरण व खंडणीप्रकरणात बोरसे याची भूमिका याबाबत चौकशी करण्यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एम. एम. माळी यानी मंगळवार (दि. २०) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.