नाशिक | प्रतिनिधी | Nashik
फोरेक्स ट्रेडिंगमध्ये (Forex Trading) आर्थिक गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून शहरातील एका गुंतवणूकदाराला (Investor) ९४ लाखांचा गंडा घालणाऱ्या टोळीचा काहीसा सुगावा सायबर पोलिसांनी लावला आहे. ९४ लाख रुपये उकळल्यानंतर हे पैसे विविध बँक खात्यांत उलाढाल करुन गुन्ह्यात सहभागी दोघा बँक खातेदारांची ओळख पटली असून त्यांना नाशिक शहर सायबर पोलिसांनी (Cyber Police) मुंबईतून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे सखोल तपास सुरु करण्यात आला असून प्रकरणातील रक्कम पैस काही निनावी बैंक खात्यांतून परदेशात पोहोचल्याते कळते.
शेअर मार्केटमध्ये (Stock Market) आर्थिक गुंतवणूक करण्यास भाग पाडून भारत देशासह विदेशात वास्तव्य करणाऱ्या सायबर चोरट्यांनी एका गुंतवणूकदाराकडून तब्ब्ल ९४ लाख रुपये उकळले होते. विशेष म्हणजे या गुंतवणूकदाराने गुंतविलेले १७ लाख रुपये परत मिळविण्यासाठी प्रयत्न केला असता, त्यासाठी विविध टॅक्सच्या नावाखाली आणखी ७७ लाख रुपये घेत ही फसवणूक करण्यात आली होती. या तक्रारदारास सप्टेंबर ते डिसेंबर २०२४ या कालावधीत सायबर चोरट्यांनी व्हॉट्सअप क्रमांक ४४७८८१४६८८३९, ४४७३८६७७१०१५ आणि ४४७७९८७०५७७७ या क्रमांकांवरुन संपर्क साधला. त्यात त्यांना शेअर मार्केटसंबंधी माहिती दिली.
यावेळी संशयितांनी तक्रारदारास ‘ऑनलाईन फॉरेक्स ब्रोकर’ असल्याचे सांगितले होते. यात फॉरेक्स ट्रेडींगच्या बहाण्याने जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. संशयितांच्या बोलण्यावर विश्वास बसल्याने व इतर नागरिकांना गुंतवणुकीवर जादा परतावा मिळाल्याचे सांगण्यात आल्याने गुंतवणुकदाराने तयारी दर्शविली. त्यानुसार त्यांनी वेगवेगळ्या कालावधीत १७ लाख १२ हजार रुपये गुंतविले. मात्र, अनेक दिवस उलटूनही परतावा मिळण्यास अडचण आली. त्यामुळे त्यांनी गुंतविलेले १७ लाख रुपये काढण्यासाठी प्रयत्न केले. तेव्हा संशयितांनी (Suspected) त्यांना विविध कारणे सांगितले. पैसे परत पाहिजे असतील तर, त्यावर टॅक्स भरुन अन्य फॉर्मेलिटी करण्यास भाग पाडले.
त्यानुसार, त्यांनी सतरा लाख रुपयांपोटी टॅक्स स्वरुपात ७७ लाख रुपये भरले. मात्र, पैसे व परतावा मिळाला नाही. एकूण ९२ लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक (Fraud) झाल्याचे लक्षात आल्याने तक्रारदाराने सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला. तसेच काही बँकांकडून बँक खात्यांचे तपशिल, ट्रान्जेक्शन माहिती संकलित केली. त्यात काही महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याने सखोल तपास सुरु केला आहे.
रिकव्हरी होणार?
पुरावे मिळताच सायबर पोलीस ठाण्याचे एक पथक मुंबईत दाखल झाले. ज्या गुंतवणूकदाराने ९४ लाख रुपये ज्या विविध बँक खात्यात वर्ग केले. त्यातील दोन संशयास्पद अकाऊंट होल्डर मुंबईतून ट्रॅन्जेक्शन फिरवत असल्याचे समोर आले. त्यानुसार मुंबई व इतर भागातून त्यांना ताब्यात घेतले. त्यांना नाशिक येथे आणून सखोल तपास केला जात आहे. तुर्तास या प्रकरणात पोलिसांनी अधिकची माहिती देण्यास टाळले असून गुन्ह्यातील ९४ लाख रुपये रिकव्हर होणे मुश्किल असल्याचे समजते.