नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिकहून शिडींकडे (Nashik to Shirdi) दर्शनासाठी निघालेल्या भक्तांची कार अडवून त्यांच्याकडील १ लाख ३७ हजारांचे सोन्याचे दागिने (Gold Ornaments) इटिंगा कारमधून आलेल्या चौघांनी लुटून नेल्याची घटना शनिवारी (दि.४) सकाळी सहाच्या सुमारास घडली.
पुणे येथील चंदेला परिवार इनोव्हा (कार क्र. एम.एच.१४/डी. व्ही. ५६०७) ने नाशिक-त्र्यंबकेश्वरचे दर्शन आटोपून शिर्डीकडे निघाले होते. सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास इनोव्हा बावी ओलांडून पुढे जात असताना इटिंगा कार इनोव्हाच्या पुढे येऊन उभी राहिली. त्यातून उत्तरलेल्या चौघांनी काही समजण्याच्या आत लोखंडी वस्तूचा धाक दाखवून इनोव्हातील मनोजकुमार चंदेला, लक्ष्मीदत्त कांडपाल, शांती कांडपाल, मोनिका चर्मा, प्रियंका चंदेला, इला ओवर यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, हातातील अंगठ्या व रोख रक्कम हिसकावून घेतल्या. इनोव्हातील नऊ कपड्यांच्या बॅगा दमदाटी करून चौघांनी हिसकावून घेत इटिंगासह सिन्नरकडे (Sinnar) पलायन केले. इनोव्हातील प्रवाशांनी मदतीसाठी आरडाओरड केली, मात्र त्यावेळी रस्त्यावरून एकही वाहन नसल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही. त्यानंतर इनोव्हातील सर्वांनी वावी पोलीस ठाण्यात जाऊन लुटीची तक्रार दिली. घटना अगदी अनपेक्षित असल्यामुळे इटिंगा कारचा नंबर कुणीही पाहू शकले नाही.
दरम्यान, सदर घटनेत शांती कांडपाल यांच्या गळ्यातील ६० हजारांचे दीड तोळा सोन्याचे मंगळसूत्र, मोनिका वर्मा यांच्या गळ्यातील ३० हजारांची एक तोळ्याची सोन्याची चेन, प्रियंका चंदेला यांच्या हातातील चार हजारांची चार ग्रॅमची सोन्याची अंगठी, इला ग्रोव्हर यांच्या हातातील सात हजारांची सात ग्रॅमची सोन्याची अंगठी, लक्ष्मीदत्त कांडपाल यांच्या बँगेतील रोख २५ हजार, मनोज चंदेला यांच्या पाकिटातील रोख पाच हजार, मोनिका वर्मा यांच्या हातातील सहा हजारांची सहा ग्रॅमची सोन्याची अंगठी असा एकूण १ लाख ३७ हजारांचा ऐवज लुटारू लुटून पळाले, मनोज चंदेला यांच्या ऑफिसच्या बंगसह इनोव्हातील प्रवाशांच्या नऊ बॅगा लुटारू घेऊन गेले असून त्यात चंदेला यांचे कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे व चेकबुक यांचाही समावेश आहे. या लुटीच्या घटनेमुळे साईभक्तांमध्ये (Sai Devotees) भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या लुटारूंचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील रहिवाशांसह साईभक्तांनी केली आहे.