नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरात भरदिवसा बंद घरांची रेकी करून चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना (Police) आव्हान दिले आहे. अमृतधाम परिसरात साखरपुड्याला गेलेल्या कुटुंबाच्या घराची घरफाेडी करून तब्बल ३ लाख ९० हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला, तर इंदिरानगरमध्ये बंद बंगल्यावर हात साफ करत ५ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला. या सलग दोन घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
पंचवटीतील (Panchvati) अमृतधाम येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक गणेश हरि मंडलिक (३८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (दि.१०) कुटुंबासह साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी बाहेर होते. सकाळी अकरा ते सायंकाळी साडेपाच या काळात घर बंद होते. मुख्य दरवाजा आणि सेफ्टी दरवाजाला कुलूप लावून ते गेले; मात्र परतल्यावर दोन्ही दरवाज्यांची कुलूपे तुटलेली आढळली. चोरट्यांनी दोन बेडरूममधील कपाटांची अस्ताव्यस्त करून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा एकूण ३ लाख ९० हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी चार दिवसांनी आडगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, इंदिरानगरमधील (Indiranagar) मोदकेश्वर चौक परिसरातील अरुणोदय सोसायटीतही अशीच घटना उघडकीस आली. महेश दगू थोरात (३९) हे ११ ते १३ तारखेदरम्यान कुटुंबासह परगावी गेले असता, त्यांच्या बंद बंगल्याच्या मागील सेफ्टी दरवाजासह आतील दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. लोखंडी कपाट फोडून २ लाख २५ हजारांची रोकड आणि दागिन्यांसह एकूण ५ लाख १९ हजारांचा ऐवज चोरून नेण्यात आला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक चौधरी तपास करीत आहेत.





