नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अवैध सावकारीतून (Illegal Money Lendig) कर्जदारांना छळणाऱ्या ‘उबाठा’ पक्षाच्या नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघाचा संघटक विशाल सुभाष कदम (Vishal Kadam) याच्या अडचणीत आता आणखीच वाढ झाली आहे. त्याच्याविरोधात अवैधरित्या सावकारी करुन ‘वसुली’ केल्याबद्दल शहर पोलिसांत (City Police) तिसरा गुन्हा नोंद झाला आहे. एका गुन्ह्यात चक्क त्याच्या आईचा सहभाग असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, तो अटकेत असून काही साथीदार पसार आहेत. त्यांचा शोध सुरु आहे.
शहरात अवैधरित्या सावकारी केल्यासंदर्भाने शहर पोलिसांनी (City Police) मागील काही महिन्यांत ३४ हुन अधिक गुन्हे नोंद करुन गुन्हेगार सावकारांना गजाआड केले आहे. त्यातच, नाशिक शहर गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी सुरु असलेल्या ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ यासह ‘ऑपरेशन क्लिनअप’ नंतर नाशिककरांना (Nashik) दिलासा मिळाला असून एकूणच गुन्हेगारी, सावकारीच्या जाचाविरोधातही ते थेट पोलिसांत तक्रारी करण्यासाठी धजावले आहेत.
त्यानुसार, कब्जा, अवैध सावकारी, छळ व अपहरणाच्या प्रकरणात विशाल कदमचे ‘कारनामे’ समोर आल्याने त्याच्याविरोधात सारिका शिरोडे यांनी फिर्याद दिल्याने त्याला अटक (Areested) करण्यात आली. त्याचा साथीदार अमित मधुकर पाटील हा देखील अटकेत असून अद्याप सिद्धेश्वर अंडे, शंकर बाडेकर हे पसार आहेत. दरम्यान, कदमसह त्याची सेवानिवृत्त शिक्षिका आई रंजना सुभाष कदम, कैय्याज शेख (रा. वैदुवाडी, म्हसरुळ), शरद सोनू केदार यांच्यावर म्हसरुळ व गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यांत कदमला पुन्हा अटक केली जाणार आहे.
फिर्यादीनुसार रंजना संशयित
म्हसरुळ पोलीस ठाण्यात २८ ऑक्टोबर रोजी गुलमोहोर नगरात राहणाऱ्या ६८ वर्षीय पीडित महिलेने फिर्याद नोंदविली असून सन २००७ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विशाल कदमकडून तीन लाख रुपये व्याजाने घेतले असता त्यापोटी पंधरा लाख रुपयांची परतफेड केली. तरीही कदमसह त्याची आई रंजना व कैय्याज शेख याने अतिरिक्त व्याजाची मागणी करीत सुशीला पंडितरीव मोरे यांच्या फ्लॅटवर कर्ज काढून त्यातून व्याजाची रक्कम वळती केली. तर, फ्लॅटवर कर्ज मिळण्याकरीता दूयम निबंधक कार्यालयात नेऊन रंजना यांच्या नावावर फ्लॅटची खरेदी नोंद केली. त्यानंतर देखील कदमने अधिक पैशाची मागणी करून काय करायचे ते करा, परत येथे आलात तर तुमचा बेत पाहील असा दम भरला. दरम्यान मोरे यांची मुलगी मंगल जाधव हिचा फ्लॅटदेखील कदमसह कैयाज शेखने बळकावून ‘परत येथे आलात तर तुम्ही तुमच्या पायावर परत जाणार नाही अशी धमकी दिली.
दुसरी तक्रार
मोतीवाला कॉलेजजवळ राहणारे संजय धोंडू पाटील यांनी गंगापूर पोलिसांत फिर्याद नोंदविली आहे. त्यानुसार त्यांचे भाऊ अरुण यांनी ५ ऑगस्ट २०१५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आर्थिक अडचणीतून विशाल कदमकडून दरमहा १० टक्के व्याजाने २५ लाख रुपये घेतले होते. ही रक्कम व्याजासह परत केली असतानाही, सहा महिन्यांचे व्याज म्हणून दहा लाख रुपये जबरीने वसूल केले. त्यानंतरही पाटील बंधूसह त्यांच्या आईच्या नावावर असलेल्या विविध मालमत्ता बळकावल्या. पाटील यांना ठार मारण्याची धमकी देत मालमत्ता स्वतःसह साथीदारांच्या नावे करवून घेतल्या. यावर न थांबता एक फ्लॅट प्लाट चढ्यादराने विक्री करुन धमकी देत कागदपत्रांवर लिहून घेत खंडणी स्वरुपात मालमत्ता हडप केली. या कृत्यात शरद सोनू केदार तसेच इतर गुंडांनी घरात शिरुन दहशत माजविली, असे फिर्यादीत नमूद आहे.
ठळक मुद्दे
- सावकारीसंदर्भाने तक्रार करा, आयुक्तालयाचे आवाहन
- कुणीही दबावाला बळी न पडता निडरपणे तक्रार करावी
- कोणताही छोटा-मोठा सराईत असेल, त्याला गजाआड करणार
- कदमचे पाय आणखी खोलात; साथीदार पसार
- कदमचे ‘निवडणूक’ स्वप्न भंगलेच





