नाशिक | प्रतिनिधी | Nashik
बिअर बारमध्ये (Beer Bar) झालेला वाद मिटविणाऱ्या ‘बाउन्सर्स’शी झटापट झाल्याने उद्भवलेल्या राड्यातून सातपूरच्या (Satpur) आयटीआय सिग्रलवरील (ITI Signal) नाईस संकुलाजवळ गोळीबार झाल्याची घटना रविवारी (दि. ५) मध्यरात्री सव्वा बारा वाजता घडली. या गोळीबारात (Firing) बारमधील एक ग्राहक जखमी झाला असून खंडणी मागण्यासह ‘बाउन्सर्स’ ठेवण्यासाठी बळजबरी केल्याचे उघड झाले आहे.
याप्रकरणी आरपीआय आठवले गटाचे पदाधिकारी व सातपूर येथील माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा मुलगा संशयित भूषण लोंढेसह (Bhushan Londhe) अकरा जणांवर गुन्हा (Case) दाखल झाला आहे. दरम्यान, भाईगिरी, ‘राजकीय कनेक्शन’ ‘प्रोटेक्शन मनी’ (खंडणी) असे अनेक मुद्दे या गोळीबारातून उघड होताना दिसत आहेत.
वरुण विजय तिवारी (वय २३, रा. सिडको) या ग्राहकाच्या पायाला गोळी लागली असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात (Private Hospital) उपचार सुरु आहेत.विशेष म्हणजे भीतीपोटी फिर्याद देण्यास कोणीही समोर येत नसल्याने अखेर सातपूर पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल केली आहे. सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर भडांगे यांच्या फिर्यादीनुसार भूषण प्रकाश लोंढे, शुभम पाटील उर्फ भुरा, प्रिन्स सिंग, दुर्गेश वाघमारे, आकाश उर्फ अभिजित अडांगळे, राहुल गायकवाड, सनी विठ्ठलकर, शुभम निकम, वेदांत संजय चाळगेसह पाच संशयितांवर गुन्हा नोंद आहे.
त्यापैकी गोळी झाडणारा शुभम याच्यासह दोघे अटकेत आहेत. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ दोनचे उपायुक्त किशोर काळे, गुन्हेशाखेचे किरणकुमार चव्हाण, सातपूरचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश अहिरे, यूनिट दोनचे सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर व गुंडाविरोधी पथक दाखल झाले. त्यानंतर जबाब, पंचनामा करुन पुढील कार्यवाही करण्यात आली.
दरम्यान, मध्यरात्री सव्वा बारा वाजता बारमध्ये काही तरुणांध्ये वाद झाले. त्यांनी बारमधील खुर्ची, टेबल व साहित्याची नासधूस केल्याने तेथील ‘बाउन्सर्स’नी त्यांना बाहेर काढले. बारमध्ये पुन्हा तरुणांत वाद झाल्याने संशयित लोंढे साथीदारांसह बारमध्ये आला. त्याने साथीदारांच्या मदतीने तरुणांना बाहेर काढले. पुन्हा वाद झाल्याने लोंढे, प्रिन्स यांनी ग्राहक वरुण तिवारीच्या डाव्या पायावर धारदार हत्याराने वार केले. शुभम उर्फ भुरा पाटीलने रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडल्याने तरुण जखमी झाला.
प्रिन्स, लोंढे, चाळगे सराईत
संशयित भूषण लोंढेवर यापूर्वी गोळीबार, हल्ल्याचे प्रयत्न, बेकायदेशीर मिरवणुका काढल्यासंबंधी गुन्हे आहेत. काही वर्षांपूर्वी आव्हाड-गवळे दुहेरी हत्याकाडांत भूषण, सनी, प्रिन्स हे निर्दोषमुक्त झाले होते. मात्र, सात वर्षे ते कारागृहात होते. यासह वेदांतही सराईत असून, त्याच्यावर दरोडा, खंडणी, खुनाचा प्रयत्न, विनयभंगाचे ९ पेक्षा जास्त गुन्हे आहेत. त्याला तडीपार आणि नाशिकरोड कारागृहात स्थानबद्ध केले होते. सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकरचा तो कट्टर साथीदार आहे. तर, इतर संशयितांवरही किरकोळ व गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत.
खंडणी वसूल, दहा टक्के भागीदारी !
हॉटेल औरा बार हा मोहित नारंग यांच्या मालकीचा असून एप्रिलपासून बिपिन पटेल व संजय शर्मा हे चालवित आहेत. तेव्हापासून लोंढे याने तेथे जाऊन भांडणे केली. पटेल व शर्मा यांना ‘येथे माझी माणसे ठेऊन हॉटेलची सुरक्षा पुरवून भांडण मिटवतो. त्या बदल्यात दहा टक्के भागीदार म्हणून रक्कम द्यावी लागेल’, असा खंडणीसाठी दम भरला. मागील दोन महिन्यांपासून लोंढेला बारचालकांनी खंडणी देण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून लोंढेसह त्याचे सर्व साथीदार हॉटेलात यायचे, तेव्हा वाद न झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
‘प्रोटेक्शन मनी’ च्या कारणातून हा वाद झाला. तिघांना अटक करुन इतरांच्या शोधार्थ पथके रवाना केली आहेत. मोक्कांतर्गत कारवाई करणार आहोत. सर्वच संशयितांची सखोल चौकशी होईल.
किशोर काळे, पोलीस उपायुक्त, झोन-२




