नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पंचवटीतील (Panchvati) राहूलवाडीत सराईतांच्या टोळीने उघडे गँगच्या सराईताचा ‘गेम’ करण्यासाठी रचलेल्या गोळीबाराच्या (Firing Case) कटात अमरावती आयुक्तालयातील तीन पोलिसांना (Police) अखेर निलंबित करण्यात आले आहे. अमरावती कारागृहातील कैद्याला नाशिकच्या एका लॉजवर नेत गोळीबारातील संशयितांसोबत चर्चा करण्यास मदत केल्याप्रकरणी त्यांना अमरावती पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी निलंबित करुन चौकशीचे आदेश दिले आहेत. नाशिक पोलिसही शेखर निकम या कैद्याचा ताबा घेणार असून, तशी कागदोपत्री प्रक्रिया सुरु झाली आहे.
कैदी शेखर निकम याला आणणाऱ्या पथकातील उपनिरीक्षक मनोहर राठोड यांच्यासह मुकेश यादव व सिद्धेश्वर गुट्टे अशी निलंबित पोलीस अधिकारी व अंमलदारांची नावे आहेत. सन २०१७ मध्ये पेठ रस्त्यावर सराईत गुन्हेगार (Criminal) संतोष उघडे टोळीने किरण निकम या गुन्हेगाराची निघृण हत्या केली होती. तेव्हापासून दोन्ही टोळ्यांमध्ये वैमनस्य असून, निकम खुनातून निर्दोष सुटलेला सागर जाधव याच्यावर पंधरा जणांनी १७ सप्टेंबरच्या पहाटे राहुलवाडीत गोळी झाडली. या हल्ल्यात सागर जखमी झाल्यानंतर पंचवटी पोलिसांनी (Panchvati Police) तेरा संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. संशयितांमध्ये भाजपचे माजी नगरसेवक संशयित जगदीश पाटील यांचाही समावेश असून, त्यांना सात दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर नाशिक न्यायालयाने रविवारी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
दरम्यान, या गोळीबारातील मुख्य संशयित (Suspected) विकी आणि विकास वाघ यांच्यासह अमोल पारे उर्फ बबल्या अद्याप पसार आहे. तर, आता सागर जाधववरील गोळीबार व हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात वरील तिघा पोलिसांना सहसंशयित करण्याच्या दृष्टीने पडताळणी व तपास केला जात आहे.
पोलिसांवर संशय?
सागर जाधव हा किरण निकमच्या हत्येतून (Murder) सन २०२३ पासून निर्दोषमुक्त आहे. तर किरणचा भाऊ शेखर निकम हा विविध गुन्ह्यांत सध्या अमरावती कारागृहात आहे. अमरावती येथून ९ सप्टेंबर रोजी तीन पोलिसांच्या पथकाने शेखर याला नाशिकमध्ये आणले. त्याला १० सप्टेंबर रोजी गंभीर गुन्ह्याच्या सुनावणीसाठी नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करायचे होते. ९ सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये आणल्यावर त्याला नाशिक पोलिसांच्या लॉकअपमध्ये ठेवणे अपेक्षित होते. मात्र, अमरावती पोलिसांनी नाशिकरोड येथील एका ‘लॉज’वर शेखरसह मुक्काम केला. त्या ठिकाणी पंचवटी गोळीबारातील संशयित विकी वाघ व इतर साथीदार आणि माजी नगरसेवक जगदीश पाटीलही होते. हे सर्व सीसीटीव्हीत चित्रित असून, पुरावे, संभाषण व सीसीटीव्हीसह व्हिडिओ पोलिसांनी जप्त केले आहेत.





