नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरात दिवसाआड सोनसाखळी (Gold Chain) ओरबाडण्याचे प्रकार सुरु असून अद्यापही चोरटे सापडण्यात पोलिसांना (Police) वाव मिळत नसल्याचे चित्र आहे. नुकत्याच दोन घटनांत ज्येष्ठ महिलांना लक्ष्य करुन चोरट्यांनी त्यांचे दागिने पळविले असून, तिसऱ्या घटनेत सातपूर भागात एका व्यक्तीची जबरी लूट करण्यात आली आहे. याबाबत गुन्हे दाखल झाले आहेत.
प्रमिला सुरेश पवार (७१, रा. बेंडकुळेनगर, गंगापूररोड) यांच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (ता. ६) सकाळी पावणे आठच्या सुमारास त्या गंगापूररोडने मॉर्निंग वॉक करीत होत्या. रियॉल्टो बिल्डिंगसमोर त्या असताना, पिवळ्या रंगाच्या टी-शर्ट घातलेला संशयित (Suspected) त्यावेळी मोहनलाल थाळीशेजारील वॉईन शॉपसमोर उभा होता. प्रमिला पवार या पायी चालत असताना संशयित पाठीमागून चालत आला आणि त्याने त्यांच्या गळ्यातील ६० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने खेचून पळ काढला. गंगापूर पोलिसात (Gangapur Police) जबरी चोरीचा गुन्हा दाखल असून, उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.
तसेच दुसरी घटना दीपालीनगरमध्ये घडली. सुमन रामदास निकम (६९, रा. पीयूष सुयश अपार्टमेंट) यांच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (दि. ६) दुपारी एकच्या सुमारास त्या अपार्टमेंटमध्ये एकट्या असताना संशयित भाग्यश्री व तिचा पती रवी खैरनार हे दोघे त्यांच्या घरात लबाडीच्या इराद्याने शिरले. त्यावेळी संशयितांनी त्यांच्या गळ्यातील १ लाख, २० हजारांची सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून नेली. मुंबईनाका पोलिसात (Mumbai Naka Police Station) गुन्हा दाखल केला असून उपनिरीक्षक शेख हे तपास करत आहेत.
सीटबेल्ट लावताना लूटमार
त्र्यंबकरोडवरील ज्योती विद्यालयासमोर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कारचालकाला लुटल्याचा प्रकार घडला. सॅम्युअल स्टिफन फर्नाडिस (३७, रा. जाधव संकुल, अशोकनगर, सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (दि.५) दुपारी तीनच्या सुमारास ते त्यांच्या वॅनआर कारने जात असताना सीटबेल्ट लावण्यासाठी ज्योती विद्यालयासमोरील मोकळ्या जागेत थांबले. त्यावेळी दोन दुचाकीवरुन (एमएच १५ जेएफ ०५२४, एमएच १५ जीबी ६३५७) संशयित आले. यातील एकाने सॅम्युल यांच्या शर्टच्या खिशातील २,७०० रुपये बळजबरीने हिसकावून घेत पळ काढला. सातपूर पोलिसात (Satpur Police) गुन्हा दाखल आहे.