नाशिक | प्रतिनिधी | Nashik
घरगुती वापराच्या गॅस (Domestic Gas ) टाक्यातील द्रवरुप वायू व्यावसायिक वाहनांच्या इंधन टाकीत अवैधरित्या भरणा करण्याच्या ठिकाणावर मंगळवारी (दि.२६) गंगापूर व सातपूर पोलिसांनी संयुक्तरित्या छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी घरगुती वापराच्या ५७ गॅस टाकी जप्त केल्या आहे. याबाबत सातपूर पोलिस ठाण्यात (Satpur Police Station) रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
श्रमिकनगर येथील हॉटेल पार्थ पॅलेस जवळील माळी कॉलनी रोडवरील एका शेडमध्ये संशयित संजय रामराव शेळके (५४, रा. अशोकनगर), प्रशांत गुलाबराव बोरसे (३८, रा. शिवाजी नगर) व गॅस भरण्याचा अड्डा चालवणारा मुख्य संशयित अनिल शेजवळ (रा. श्रमिकनगर) यांनी एचपी गॅस कंपनीच्या घरगुती वापराच्या एलपीजी गॅस टाकींचा अवैध साठा केला होता. तसेच हे तिघे लोकांकडून पैसे घेऊन त्यांच्या वाहनांमध्ये अवैधरित्या घरगुती वापराचा गॅस भरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता संशयिताने (Suspected) घरासमोर एका कारमध्ये एलपीजी गॅस सिलेंडर उलटा करून अवैधरित्या गॅस भरत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी (Police) संशयिताकडून ५७ भरलेल्या व रिकाम्या गॅसटाकी, ३ पिस्टन व इलेक्ट्रिक मोटार, गॅस भरण्यासाठी बॅटरीवर चालणारा पंप, तीन वजन काटे, दोन रिक्षा व रोकड असा ४ लाख ८२ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरिष्ठांसह गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक सुशील जुमडे, सातपूरचे वरिष्ठ निरीक्षक रणजीत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूरच्या गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, हवालदार रवींद्र मोहिते, अंमलदार मच्छिंद्र वाकचौरे, रमेश गोसावी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा