नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गंगापूररोड भागात (Gangapur Road Area) राहणाऱ्या वीस वर्षीय मैत्रिणीशी शालेय आठवणी ताज्या करत मित्राने लॉजवर नेत मद्य पाजून तिच्या तोंडात बोळा कोंबला. त्यानंतर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे मित्राने मद्याच्या नशेतील मैत्रिणीचे अश्लील फोटो मोबाईलमध्ये (Mobile) कैद करून ते मित्राला पाठवले. यानंतर या मित्रानेही व्हिडिओ डिलिट करण्यासाठी ब्लॅकमेल करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा दावा तरुणीने केला आहे. त्यानुसार विवेक देवकाते (२१) व सुमीत या दोघा संशयित मित्रांवर गंगापूर पोलीस ठाण्यात बलात्काराच्या शिक्षेसह अन्य कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
९ नोव्हेंबर २०२५ रोजी पीडितेने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, तिची ओळख नववी ते दहावीच्या शालेय शिक्षणादरम्यान देवकाते याच्याशी काही महिन्यांपूर्वी झाली होती. यानंतर दोघांत व्हॉटस्अॅपसह इन्स्टाग्रामवर (Instagram) मैत्रीपूर्ण चॅटिंग सुरू झाले. ते सुरू असतानाच ७ नोव्हेंबर २०२५ रोजी देवकाते याने तिला फोन करून भेटण्यास बोलवले. पीडिता तयार झाली असता दोघेही दुपारी मोपेडवरून गंगापूर बॅकवॉटरला फिरण्यासाठी गेले. तेथे दोघांनी निसर्गाचा मनमुराद आनंद लुटून फोटो काढले. त्यानंतर सायंकाळी घरी परतले. तेव्हा देवकाते याने सायंकाळी सहा वाजेनंतर तरुणीस फोन करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, तिने प्रारंभी नकार दिला. मात्र, देवकातेने तिचे मनपरिवर्तन करून बोलावून घेतले.
यानंतर दोघे त्र्यंबकरोडने (Trimbak Road) खंबाळे तळवाडे दरम्यानच्या एका टपरीवरून थेट लॉजवर गेले. तेथे जाण्यास नकार दिला असता त्याने तिच्या आधारकार्डच्या मदतीने खोली भाडेतत्त्वावर घेत आत नेले. तिला जबरीने अतिप्रमाणात मद्य पाजून लैंगिक अत्याचार केले. शिवाय मोबाईलमध्ये फोटो काढून घेतले. त्यानंतर हा सर्व प्रकार कुणाला सांगितला तर तुझे अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करेल, अशी धमकी दिली. त्यानंतर देवकातेने हे फोटो व व्हिडिओ मित्र सुमीतला पाठवले. यानंतर सुमीतशीही शरीरसंबंध ठेवण्याची धमकी दिली. दरम्यान, तसे न केल्यास हेच फोटो व व्हिडिओ पुढे इतरत्र व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे नमूद आहे. तपास सहाय्यक निरीक्षक शांताराम महाजन करत आहेत.
खळबळजनक दावे
पिडीतेच्या दाव्यानुसार, विवेकने तिला मद्य पाजले असता स्पर्श केला. तेव्हा त्याला ढकलले. संतापल्याने त्याने तिच्या कपड्यांनी तिचे हातपाय बांधले. ओरडण्याचा प्रयत्न केला असता तोंडात कापड कोंबले. या प्रकाराचे व्हिडिओ काढून मित्रांना सेंट केले. दरम्यान, पुढे पीडितेने खळबळजनक दावे केले असून विवेककडे दहाहून अधिक मुलींचे ‘न्यूड’ व्हिडिओ आहेत. त्याचा मोबाईल जप्त करावा व आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. दोघांचा शोध सुरू असून मोबाईल जप्त केले जाणार आहेत. या गुन्ह्यात सहसंशयितांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.




