नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सन २०२२ मध्ये उघडकीस आलेल्या नाशिकमधील (Nashik) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव नानासाहेब कापडणीस व त्यांचा मुलगा डॉ. अमित यांच्या हत्याकांडातील (Murder Case) सहसंशयित विकास हेमके याने नशेची ‘तलफ’ पूर्ण करण्यासाठी पंचवटीत खंडणीकांड घडविल्याचे उघड झाले आहे.
पानटपरीचालकास जीवे मारण्याची धमकी देत गल्ल्यातील पाच हजार रुपये हिसकावून दरमहा हप्त्याची मागणी करीत त्याने पळ काढल्याची घटना (दि. ३) सायंकाळी दिंडोरी नाका येथे घडली. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी (Panchvati Police) हेमके याला अटक (Arrested) केली असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. कैलास रत्नाकर ढोरे (वय ५१, रा. सुनंदा हाईट्स, काठे गल्ली, द्वारका) यांच्या फिर्यादीनुसार,मंगळवारी (दि. ३) सायंकाळी साडेसात वाजता दिंडोरी नाक्यावरील पानस्टॉलमध्ये असताना संशयित विकास हेमके हा दुचाकीवरुन आला.
त्यानंतर, त्याने ‘तु मला ओळखत नाही का ? मी विकास हेमके, पंचवटीचा भाई. मी येथे खून, दरोडे केले आहेत. मला दर महिन्याला हप्ता द्यावा लागेल, पैसे दे, नाहीतर तुला मी पाहून घेईल’, अशी धमकी दिली. त्याचवेळी त्याने गल्ल्यात हात घालून पाच हजार रुपये काढून घेतले. तसेच, ‘मला हप्ता द्यावा लागेल. नाहीतर तुझे दुकान इथे चालू देणार नाही. मला वेळेवर खंडणी दिली नाही तर, तुला ठार मारेल, असे धमकावतदुचाकीवरुन पळून गेला. यानंतर, ढोरे यांनी पंचवटी पोलिस ठाणे (Panchvati Police Station) गाठत फिर्याद दिली. त्यानुसार, गुन्हा दाखल झाला असून हेमकेला मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. तपास सहायक निरीक्षक शरद पाटील करत आहेत.
दोन महिन्यांपासून जामिनावर
विकास हेमके हा कापडणीस दुहेरी हत्याकांडात संशयित आहे. गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून तो व हत्याकांडाचा मास्टरमाइंड संशयित राहुल जगताप, प्रदीप शिरसाठ व सूरज मोरे हे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आहेत. तर, जगताप सोडून अन्य संशयित जामिनावर आहेत. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपूर्वीच हेमकेला या हत्याकांडात जामीन मंजूर झाला आहे. त्यातच, त्याला मद्य, गांजा व इतर नशेचे व्यसन असून आर्थिक ‘चणचण’ भासत असल्याने त्याने थेट टपरीचालकाला धमकावत खंडणी उकळली व गुन्हा करताना त्याने वेगवेगळी नशा केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या प्रकरणात सहभाग
२८ जानेवारी २०२२ रोजी कापडणीस पितापुत्र बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार नोंद झाली. तपासात नानासाहेबांच्या डीमॅट खात्यातून ९० लाख रुपये शिरसाठच्या खात्यात वर्ग झाल्याचे समोर आले. त्याने हे पैसे राहुल जगतापकडे दिल्याचे उघडकीस आले. जगतापच्या चौकशीत दोघांचा खून झाल्याचे उघड झाले. त्याने साथीदारांच्या मदतीने नानासाहेबांचा मृतदेह मोखाडा तर अमितचा राजूर येथे जाळून टाकला. पोलिसांनी जगतापला राहत्या घरातून तर, फरार तिघांना औरंगाबादमधून ताब्यात घेतले होते. सखोल तपासाअंती सोळाशे पानांचे दोषारोपपत्र दाखल असून १० जून २०२२ पासून न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे.





